'तिला' शिकायचे होते, पण त्यांनी लग्न लावून दिले; तुळजापूरात आईसह मुलीने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 07:28 IST2025-03-27T07:26:35+5:302025-03-27T07:28:23+5:30

घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत मुलीचे शिक्षण थांबवून विवाह लावून दिल्याची खंत

A girl and her mother in Dharashiv district ended their lives because she got married while she wanted to study | 'तिला' शिकायचे होते, पण त्यांनी लग्न लावून दिले; तुळजापूरात आईसह मुलीने घेतला गळफास

'तिला' शिकायचे होते, पण त्यांनी लग्न लावून दिले; तुळजापूरात आईसह मुलीने घेतला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क, तुळजापूर (जि. धाराशिव): शिक्षक कुटुंबातील एका विवाहित मुलीसह तिच्या आईने एकाच दोरीला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना तुळजापूर शहरात मंगळवारी उशिरा उघडकीस आली. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून, त्यात मुलीचे शिक्षण थांबवून शेतकरी तरुणासोबत विवाह लावून दिल्याची खंत व्यक्त केल्याची माहिती तुळजापूर पोलिसांनी दिली. या प्रकरणात बुधवारी आत्महत्येची नोंद घेण्यात आली आहे.

तुळजापूर येथील हडको भागात असलेल्या लिटिल फ्लॉवर्स शाळेत मुख्याध्यापक असलेले संजय पवार हे मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेले. यानंतर त्यांच्या गवते प्लॉटिंग येथील घरी पत्नी रत्नमाला पवार आणि विवाहित मुलगी प्रतीक्षा पाटील यांनी एकाच दोरीला गळफास घेतला. हा प्रकार दुपारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. रात्री ९:३० वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. प्रतीक्षा पाटील (वय २३) हिचा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी तालुक्यातील सापटणे येथील एका शेतकरी तरुणाशी वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता.

कारणांचा उल्लेख करताना लिहिले...

घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये प्रतीक्षा पाटील हिला पुढील शिक्षण घ्यायचे होते. मात्र, शिक्षण बंद करून मुलासोबत लग्न लावून देण्यात आल्याची खंत व्यक्त करत आत्महत्या करत असल्याचे तिने म्हटले. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.

आत्महत्येपूर्वी घराची चावी शेजाऱ्याकडे...

  • आत्महत्या करण्यापूर्वी रत्नमाला पवार आणि प्रतीक्षा पाटील यांनी आपल्या घराचा दरवाजा बंद न करता तो पुढे लोटून दुसऱ्या गेटला कुलूप लावून शेजाऱ्यांना चावी दिली.
  • आपण बाहेर जातोय, असे सांगत पुढे केलेल्या दुसऱ्या दरवाजाने घरात प्रवेश केला व एकाच दोरीने माय-लेकीने गळफास घेतला.
  • मृत मुलीची शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र, इच्छेविरुद्ध घडल्याने ती नैराश्यात होती, असे स्पष्ट होते.

Web Title: A girl and her mother in Dharashiv district ended their lives because she got married while she wanted to study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.