वाहनभाडे काढून देण्यासाठी सरकारी डॉक्टरने घेतली लाच
By चेतनकुमार धनुरे | Published: March 11, 2023 06:57 PM2023-03-11T18:57:12+5:302023-03-11T18:57:33+5:30
उपजिल्हा रुग्णालयात तक्रारदाराने त्याच्या मालकीची दोन वाहने भाडेतत्त्वावर लावली आहेत.
धाराशिव : उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात भाडेतत्त्वावर लावलेल्या दोन वाहनांचे भाडे काढून देण्यासाठी डॉक्टरने लाच घेतल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला आहे. याप्रकरणी लाचखोर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह येथील सेवकासही रंगेहात ताब्यात घेऊन उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. तानाजी शंकर राठोड हे उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सेवकामार्फत सात हजार रुपयांची लाच स्वीकारली आहे.
उपजिल्हा रुग्णालयात तक्रारदाराने त्याच्या मालकीची दोन वाहने भाडेतत्त्वावर लावली आहेत. या दोन्ही वाहनांचे जवळपासा सहा महिन्यांपासून भाडे काढण्यात आले नव्हते. हे भाडे काढून देण्यासाठी डॉ. राठोड यांची लॉगबुकवर स्वाक्षरी आवश्यक होती. ही स्वाक्षरी करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे सात हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकाराची माहिती वाहनमालकाने तक्रारीच्या माध्यमातून धाराशिवच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. उपाधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांनी लाच मागणीची शहानिशा केल्यानंतर पोलिस निरीक्षक विकास राठोड, कर्मचारी इफ्तेखार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके या पथकाद्वारे शनिवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने डॉ. राठोड यांच्या सांगण्यावरून अपघात विभागातील सेवक राजू राम थोरात याच्याकडे लाचेची रक्कम सुपूर्द केली. यावेळी सापळा रचलेल्या पथकाने थोरात यास रंगेहात ताब्यात घेत लाच मागणाऱ्या डॉ. राठोड यांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.