जेष्ठांना घरपोच ‘प्रेमाचा टिफिन’; तांदूळवाडी ग्रामपंचायतीचा अन्नछत्रातून स्तुत्य उपक्रम

By गणेश कुलकर्णी | Published: August 17, 2023 05:50 PM2023-08-17T17:50:51+5:302023-08-17T17:51:02+5:30

निराधार, जेष्ठांना घरपोच जेवणाचा डब्बा देण्याचा राज्यातील पहिला उपक्रम

A home-grown 'Premacha Tiffin' for seniors; Notable initiative of Tandulwadi Gram Panchayat | जेष्ठांना घरपोच ‘प्रेमाचा टिफिन’; तांदूळवाडी ग्रामपंचायतीचा अन्नछत्रातून स्तुत्य उपक्रम

जेष्ठांना घरपोच ‘प्रेमाचा टिफिन’; तांदूळवाडी ग्रामपंचायतीचा अन्नछत्रातून स्तुत्य उपक्रम

googlenewsNext

धाराशिव : वयाची ‘साठी’ पार केल्यावर हातात वृद्धत्वाची ‘काठी’ येते असे म्हणतात. शाब्दिक अर्थ बाजूला ठेवला तरी, जीवनप्रवास ‘उतरतीला’ लागलाय! असाच यातला संदेश. मग, कोणाची भरल्या घरात परवड होते, कोणाचा ‘आधार’ कामधंद्यासाठी स्थलांतरित झालेला असतो तर कुणी ‘निराधार’ म्हणून आलेला दिवस काढत असतात. कळंब तालुक्यातील तांदूळवाडी येथील अशा ग्रामस्थांना आता दररोज ‘प्रेमाचा टिफिन’ मिळणार असून, निराधार वयस्कांसाठी अन्नछत्र चालवणारी तांदूळवाडी ही राज्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरणार आहे.

कळंब शहराला खेटलेलं तांदूळवाडी हे छोटसं गाव. साधारणत: अडीचशे उंबरठे, दीडेक हजार लोकसंख्या. अशातच गावच्या सरपंचकीची धुरा तरुण, उच्च शिक्षित ॲड. प्रणित शामराव डिकले यांच्या खांद्यावर आली. सर्वांना सोबत घेत, राजकारणाचे जोडे बाजूला ठेवत ‘सर्वांगीण विकास’ हाच विषय सध्या ग्रा.पं.च्या अजेंड्यावर. याविषयी सरपंच ॲड. प्रणित डिकले सांगतात. मित्र आनंद काळे यांनी ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, ज्यांना श्रम होत नाही, हाताने स्वयंपाक करता येत नाही, असे काही वयस्क आहेत, असे सांगितले होते. यातूनच मदतीची गरज असलेल्या, हाताने स्वयंपाक करणे शक्य नसलेल्या वयस्कांना किमान दोन वेळचे भोजन देण्याचा संकल्प करण्यात आला.

गावातील अशा वयस्कांची संख्या, त्यांची स्थिती, त्यांना लागणारे अन्न, त्यासाठी चालविले जाणारे अन्नछत्र, त्याचा शिधा, मनुष्यबळ, आर्थिक बाजू यावर अभ्यास करून ग्रामनिधी व लोकसहभागातून सत्तरी पार केलेल्या वयस्कांसाठी दोन वेळचे जेवण पुरवणारा उपक्रम बांधला गेला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ग्रामस्थांच्या उपस्थितीत या अन्नछत्राचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी गावातील १६ वयस्कांनी या ‘प्रेमाचा टिफिन’चा आस्वाद घेतला. पुढे समस्त ग्रामस्थांच्या सहयोगातून कायमस्वरूपी हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे सरपंच ॲड. डिकले म्हणाल्या.

दोघींना रोजगार
प्रतिमाह तीन हजार मानधनावर स्वयंपाकासाठी नियुक्त केलेल्या दोन महिलांच्या हातून वयस्कांना दोन वेळचे भोजन तर मिळणार आहे, शिवाय दोघींना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

घरापर्यंत डबा
यात संबंधित वयस्कांचे संमतीपत्र घेतले जातेय. भोजन अन्नछत्रात किंवा घरी नेऊनही करता येणार आहे. ज्यांना शक्य नाही, त्यांच्या घरापर्यंत डबा पोहाेच करण्याची तजवीज ठेवली आहे.

अनेकांची मदत
ग्रामनिधी, लोकसहभागावर बेतलेल्या राज्यातील या पहिल्याच उपक्रमासाठी शाळेतील गुरुजींनी पाच हजारांची मदत दिली. तर एका अनामिकाने एक क्विंटल गहू, ५० किलो तांदूळ आणून दिले.

Web Title: A home-grown 'Premacha Tiffin' for seniors; Notable initiative of Tandulwadi Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.