अंगणात खेळणारी चिमुकली बेपत्ता; दुसऱ्या दिवशी विहिरीत आढळला मृतदेह, घातपाताचा संशय
By बाबुराव चव्हाण | Published: May 5, 2023 02:08 PM2023-05-05T14:08:23+5:302023-05-05T14:09:33+5:30
घरापासून दूर शेतातील विहिरीत मृतदेह आढळल्याने वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला
ईट (जि. धाराशिव) : घरासमाेरील अंगणात खेळणारी चार वर्षीय चिमुकली गुरुवारी दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली हाेती. कुटुंबीयांनी सर्वत्र शाेध घेऊनही रात्री उशिरापर्यंत तिचा तपास लागला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी त्या चिमुकलीचे शव घराच्या पाठीमागील शेतात असलेल्या विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले. ही घटना भूम तालक्यातील पखरूड येथे घडली.
भूम तालुक्यातील पखरूड येथील खर्डा राेडलगत उमेश भाेसले यांचे घर आहे. याच ठिकाणी भाेसले कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांना रसिका नावाची चार वर्षीय मुलगी व मुलगा अशी अपत्ये आहेत. गुरुवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास रसिका व तिचा भाऊ दाेघेही घरासमाेरील अंगणामध्ये खेळत हाेते. त्यांची आई काेमल भाेसले या घरात कामात व्यस्त हाेत्या. दरम्यान, काम आटाेपल्यानंतर मुलांना पाहण्यासाठी त्या घराबाहेर आल्या असता, केवळ मुलगाच दिसून आला. रसिका काही दृष्टीस पडली नाही. शेजारी काेणाच्या तरी घरी गेली असावी, असे समजून त्यांनी प्रत्येक घरी जाऊन ‘रसिका आली आहे का?’ अशी विचारणा केली.
परंतु, ‘‘सकाळपासून रसिका आमच्याकडे आलेली नाही’’, असे सर्वांनीच सांगितले. रसिका अवघ्या चार वर्षांची असल्याने तिला स्वत:हून घरासमाेरील रस्त्यापर्यंतही जाता येत नाही. मग रसिका गेली कुठे, असा प्रश्न तिच्या आईसह वडील उमेश भाेसले यांना पडला. यानंतर त्यांनी संपूर्ण गावात शाेध घेतला. खर्डा राेड परिसरातही शाेधाशाेध केली. परंतु, रसिकाचा काहीच तपास लागला नाही. असे असतानाच शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरामागे असलेल्या शेतातील एका विहिरीच्या पाण्यावर चिमुकल्या रसिकाचे शव तरंगताना आढळून आले. हे वृत्त समजताच रसिकाच्या आईने हंबरडा फाेडला. याप्रकरणी उमेश भाेसले यांनी वाशी पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
रसिका विहिरीपर्यंत गेली कशी?
रसिका ही अवघ्या चार वर्षांची चिमुकली आहे. तिला स्वत:हून घरासमाेरील २० ते २५ फुट अंतरावर असलेल्या खर्डा रस्त्यापर्यंतही जाता येत नाही. घरामागील शेतात असलेली विहीर तर खूप दूर आहे. संपूर्ण शेताची नांगरट झाली आहे. धडधाकट व्यक्तिला या नांगरटीच्या शेतातून चालता येत नाही. मग रसिका तिथपर्यंत पाेहाेचली कशी, असा सवाल करीत वडील उमेश भाेसले यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला.