देवदर्शन करुन परतताना ऑटोला ट्रकची धडक, एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

By चेतनकुमार धनुरे | Published: August 28, 2023 07:15 PM2023-08-28T19:15:30+5:302023-08-28T19:15:50+5:30

आई-वडील तसेच आजीही अपघातात मृत्यू पावल्याने दोन्ही मुले उघड्यावर आली आहेत.

A truck collided with an auto while returning from Devdarshan, four members of the same family died | देवदर्शन करुन परतताना ऑटोला ट्रकची धडक, एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

देवदर्शन करुन परतताना ऑटोला ट्रकची धडक, एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

googlenewsNext

उमरगा (जि.धाराशिव) : श्रावण सोमवार निमित्त कर्नाटकातील अमृतकुंड येथे देवदर्शन आटोपून गावाकडे परतणाऱ्या एका कुटूंबियांच्या ऑटोला ट्रकने धडक दिली. यामध्ये चौघे जागीच ठार असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर-हैद्राबाद मार्गावरील मन्नाळी येथे घडली.

उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी येथील सुनिल महादेव जगदाळे (३५) हे श्रावण सोमवारच्या निमित्ताने आई, पत्नी, मुलगी, भाची व अन्य दोघी, असे सात जण ऑटोरिक्षाने कर्नाटकच्या बसवकल्याण तालुक्यातील अमृतकुंड येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत गावाकडे निघाल्यानंतर सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील मन्नाळी कॉर्नर येथे एका ट्रकने जगदाळे यांच्या ऑटोरिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर ऑटोरिक्षा दुभाजकावर चढला. त्याच क्षणी रस्त्यावर पडलेले प्रमिला सुनिल जगदाळे (३२) यांचा ट्रकखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. तर सुनिल जगदाळे, अनुसया महादेव जगदाळे (७०), पूजा विजय जाधव (१७, रा. शहापूर, ता. तुळजापूर) या तिघांचा उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाय, गीता शिवराम जगदाळे (४०) या गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.

लक्ष्मी सुनिल जगदाळे (८) व अस्मिता शिवराम जगदाळे (१०) या जखमी मुलींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताचे वृत्त कळताच बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांनी अपघातस्थळी भेट दिली. तर उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

ट्रक चालक गेला पळून...
रिक्षाला धडक दिल्यानंतर अपघाताची भीषणता पाहून ट्रकचालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे. बसवकल्याणचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवमसु राजपूत, पोलिस निरीक्षक सुवर्णा मलशेट्टी, पोलिस हवालदार राजशेखर रेड्डी, मल्लीकार्जुन सलगरे यांनी अपघातस्थळी भेट देऊन जखमींना उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. प्रभाकर बिचकाटे यांनी जखमींवर उपचार केले.

पती-पत्नीचा मृत्यू, मुले उघड्यावर...
या अपघातात सुनील जगदाळे व त्यांची पत्नी प्रमिला हे दोघेही मयत झाले आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून, हे दोघेही दहा वर्षाच्या आतील आहेत. आई-वडील तसेच आजीही अपघातात मृत्यू पावल्याने हे दोन्ही मुले उघड्यावर आली आहेत.

Web Title: A truck collided with an auto while returning from Devdarshan, four members of the same family died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.