चेहऱ्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो, गळ्यात घंटा बांधून अनोखे आंदोलन
By सूरज पाचपिंडे | Updated: September 14, 2023 14:41 IST2023-09-14T14:40:19+5:302023-09-14T14:41:40+5:30
गळ्यात घंटा बांधून शासनाचा नोंदविला निषेध

चेहऱ्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो, गळ्यात घंटा बांधून अनोखे आंदोलन
धाराशिव : गतवर्षी झालेल्या सततच्या पावसाचे अनुदान, अग्रीम पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. शासन केवळ घोषणा करतेय मात्र, शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही, असा आरोप करीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो चेहऱ्यास लावून व गळ्यात घंटा बांधून धाराशिव शहरात गुरुवारी अनोखे आंदोलन केले. यावेळी शासनाचा निषेध नोंदवून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
गतवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र, नुकसानभरपाई शेतकऱ्यांना अद्यापर्यंत मिळालेली नाही. शिवाय, खरीप हंगामात पाऊस नसल्याने पिके करपून गेली. शासनाकडून अग्रीम पिकविमाही दिलेला नाही. शासनाकडून नुसतीच घोषणाबाजी केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करीत बैल पौळा सणाचे औचित्य साधून अमोल जाधव, विनायक ढेंबरे, विठ्ठल विधाते या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो चेहऱ्याला लावून व गळ्यात घंटा बांधून सरकारच्या नावाने बोंब ठोकली.
शेतकऱ्यावर वाईट दिवस आणणाऱ्या सरकारच करायंच काय, खाली मुंडक वर पाय, शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा मिळालाच पाहिजे, सततच्या पावसाचे अनुदान मिळालेच पाहिजे, कोणं म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहंत नाही, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला.