पदयात्रा काढली, रस्ताही राेखला; आता मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपाेषण
By बाबुराव चव्हाण | Published: September 9, 2023 03:46 PM2023-09-09T15:46:57+5:302023-09-09T15:47:20+5:30
ढाेकीत वाहतूक ठप्प : जरांगेंच्या समर्थनार्थ सुरू केले आंदाेलन
ढाेकी (जि. धाराशिव) -जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनाेज जरांगे पाटील यांचे उपाेषण आंदाेलन सुरू आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी शनिवारी धाराशिव तालुक्यातील ढाेकी गावातून मराठा बांधवांनी पदयात्रा काढली. यानंतर लातूर मार्ग राेखून ९ जणांनी बेमुदत उपाेषण सुरू केले आहे. जाेपर्यंत आरक्षण मिळत नाही, ताेवर मागे हटणार नाही अशी भूमिका यावेळी आंदाेलनकर्त्यांनी मांडली.
जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपाेषण आंदाेलनास राज्यभरातून दिवसागणिक पाठिंबा वाढू लागला आहे. जिल्ह्यात गावाेगावी उपाेषणे सुरू झाली आहेत. रास्ताराेकाे सारखी आंदाेलनही हाेताहेत. शुक्रवारी ढाेकी येथे मराठा बांधवांनी बैठक घेऊन जरांगेंच्या समर्थनार्थ बेमुदत उपाेषणास बसण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार शनिवारी सकाळी दहा वाजता गावातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. यानंतर रास्ताराेकाे आंदाेलन करून संग्राम देशमुख, सतीश वाकुरे, प्रमोद देशमुख, प्रज्वल हुबे, शिवाजीराव बेडके, किशोर शेंडगे, मुकेश जाधव, जीवन कावळे या नऊ जणांनी छत्रपती शिवाजी महाराज चाैकात बेमुदत उपाेषण सुरू केले. याप्रसंगी ढोकी व परिसरातील गोरेवाडी, कोलेगाव,ढोराळा, देवळाली, माळकरंजा, रुई, तुगाव, भडाचीवाडी, कावळेवाडी, बुकनवाडी, गोवर्धनवाडी आदी गावांतील मराठा बांधव उपस्थित हाेते. दरम्यान, उपस्थितांनी दिलेल्या ‘एक मराठा, लाख मराठा’ यासारख्या घाेषणांनी संपूर्ण परिसर दणाणला हाेता. आंदाेलनस्थळी तगडा पाेलीस बंदाेबस्त तैनात आहे.