धाराशिवमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवले
By बाबुराव चव्हाण | Published: March 1, 2024 05:29 PM2024-03-01T17:29:24+5:302024-03-01T17:29:46+5:30
मराठा समाजाला ‘ओबीसी’तून आरक्षण न मिळाल्याने ताे मागील सात-आठ दिवसांपासून नैराश्यात हाेता.
काक्रंबा (जि. धाराशिव) : तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (तूळ) येथील योगेश संजय जाधव (२७) या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना देवसिंगा शिवारात १ मार्च राेजी सकाळी उघडकीस आली.
तुळजापूर तालुक्यातील दिवसिंगा (तूळ) येथील योगेश जाधव हा तरुण मराठा आंदोलनामध्ये नेहमीच सक्रिय राहत असे. दरम्यान, मराठा समाजाला ‘ओबीसी’तून आरक्षण न मिळाल्याने ताे मागील सात-आठ दिवसांपासून नैराश्यात हाेता. यातूनच त्याने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे नातेवाईकांनी सांगितले. ही घटना १ मार्च राेजी सकाळी उघडकीस आली. पुढील तपास पोलीस करत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, बहीण असा परिवार आहे.