भरचौकात तरुणाची कोयत्याने हत्या; एकास ठाेकल्या बेड्या, चाैघे फरार
By बाबुराव चव्हाण | Published: April 27, 2023 06:23 PM2023-04-27T18:23:12+5:302023-04-27T18:31:53+5:30
चौघांच्या अटकेसाठी पोलिसांची दाेन पथके मागावर आहेत
धाराशिव : शहरातील सांजा राेडलगत असलेल्या भवानी चाैकामध्ये एका ३० वर्षीय तरुणाची बुधवारी दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास उजवा हात व पाय ताेडून निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी आनंदनगर पाेलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, एका आराेपीस बेड्या ठाेकल्या, तर उर्वरित चाैघा मारेकऱ्यांच्या मागावर पाेलिसांची दाेन पथके रवाना करण्यात आली आहेत.
शेताच्या बांधावरून बुधवारी दुपारी सांजा येथील राम ऊर्फ रामेश्वर किसन माेहिते हा तीस वर्षीय तरुण बुधवारी दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास सांजा राेडलगत असलेल्या भवानी चाैकातील एका पानटपरीवर थांबला हाेता. याचवेळी गावातील पाच जणांनी संगनमत करीत काेयता आणि कत्तीच्या साहाय्याने उजवा हात, तसेच पायावर सपासप वार केले. त्यामुळे तरुण जमिनीवर काेसळला. जवळपास वीस मिनिटे ताे घटनास्थळीच पडून हाेता. यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तपासून डाॅक्टरांनी मयत घाेषित केले.
हे समजताच कुटुंबीयांनी पाेलिसांवर आराेप केले. महिनाभरापासून तक्रारी देण्यासाठी जात हाेताे; परंतु आमची तक्रार नाेंदवून घेतली नाही. त्यामुळे आमच्या मुलाचा जीव गेला, असे माध्यमांना सांगितले. दरम्यान, मयताचे वडील पांडुरंग किसन माेहिते यांनी आनंदनगर पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून गावातील अक्षय रामहरी पडवळ, सागर रामहरी पडवळ, रणजित सुभाष सूर्यवंशी, नारायण नागनाथ डाेंगरे आणि काका चिवळादादा सूर्यवंशी (सर्व रा. सांजा) यांच्याविरुद्ध भादंसंचे कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास गुन्हा नाेंद झाला. दरम्यान, पाचपैकी एका आरोपीस पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या असून, चाैघे मारेकरी फरार झाले आहेत. त्यांच्या मागावर दाेन पथके रवाना करण्यात आली आहेत.
गुरुवारी सकाळी अंत्यविधी
बुधवारी दुपारी तरुणाची हत्या झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, आराेपींना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शव जिल्हा कचेरीसमाेर ठेवण्याची भूमिका नातेवाइकांची हाेती. त्यामुळे शव रात्रभर जिल्हा रुग्णालयातच हाेते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पाेलिसांनी नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर साधारणपणे १० वाजेच्या सुमारास पाेलिस बंदाेबस्तात रुग्णवाहिकेतून शव सांजा गावात नेण्यात आले. यानंतर अंत्यसंस्कार पार पडले.
एकास केली अटक
तरुणाच्या हत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सांजा येथील दत्तनगर भागातील रहिवासी नारायण नागनाथ डाेंगरे यास २७ एप्रिलच्या रात्री १२:५१ वाजता अटक करण्यात आली. न्यायालयासमाेर हजर केले असता त्याला ३ मेपर्यंत पाेलिस काेठडी मिळाली आहे. उर्वरित आराेपींचा पाेलिस शाेध घेत आहेत.