Video: आई राजा उदे-उदे! कुंकू-फुलांच्या उधळणीत झाले तुळजाभवानीचे सीमोल्लंघन
By चेतनकुमार धनुरे | Updated: October 24, 2023 13:13 IST2023-10-24T13:11:18+5:302023-10-24T13:13:12+5:30
देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

Video: आई राजा उदे-उदे! कुंकू-फुलांच्या उधळणीत झाले तुळजाभवानीचे सीमोल्लंघन
धाराशिव : श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात मंगळवारी सकाळी ६ वाजता तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला. हा सोहळा आपल्या नजरेत साठविण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरात दाखल झाले होते. यावेळी आई राजा उदे, उदेचा केलेला गजर शहरभर निनादत होता.
श्री तुळजाभवानी मंदिरात मंगळवारी पहाटे देवीची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर देवीची पालखी टेकवून पुन्हा आरती करण्यात आली. मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपारिक पध्दतीने मंत्रोपच्चार, आई राजा उदे उदेचा जयघोष आणि पारंपरिक संबळ वाद्याच्या साथीने विधी करण्यात आले.
तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपले सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते. सीमोल्लंघनानंतर देवी पुन्हा पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते.यावेळी देवीच्या मुर्तीला इजा होऊ नये म्हणून १०८ साड्या परिधान करण्यात येतात. शेवटी प्रथेनुसार नगरच्या भक्तांनी देवीची पालखी तोडून त्याचे होमात विसर्जन केले. यावेळी सर्व भाविकांनी कूंकू व फुलांची उधळण करत आई राजा उदे उदेचा जयघोष केल्याने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
आई राजा उदे,उदेच्या गजरात तुळजाभवानीचे सीमोल्लंघन #विजयादशमी#दसराpic.twitter.com/MGkwOT4kRI
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 24, 2023
यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओंम्बासे, विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, तहसीलदार तथा व्यवस्थापक सोमनाथ माळी, सहायक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, सहायक जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे यांच्यासह महंत, उपाध्ये, भोपे, पाळीकर, पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.