परंड्याचा पेच! उद्धवसेनेकडून पाटलांना एबी फॉर्म; तर पवारांच्या मोटेंचा AB फॉर्मसह अर्ज दाखल
By चेतनकुमार धनुरे | Published: October 25, 2024 05:52 PM2024-10-25T17:52:15+5:302024-10-25T17:55:26+5:30
राष्ट्रवादी व उद्धवसेना दोघेही या जागेसाठी आग्रही होते. मात्र, पेच सुटत नसल्याने गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी रणजीत पाटील यांना एबी फाॅर्म देऊन टाकला.
धाराशिव : जिल्ह्यातील परंडा मतदारसंघावरुन उद्धवसेना व शरद पवार गटात खटके उडाल्याचे जाहीर झाले आहे. जागेचा तिढा सुटत नसल्याने गुरुवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारास एबी फाॅर्म देऊन टाकला. यापाठोपाठ आता शुक्रवारी शरद पवार गटाकडून माजी आमदार राहूल मोटे यांनीही एबी फाॅर्मसह शुक्रवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे या जागेवर आघाडीत बिघाडीचे संकेत मिळत आहेत.
परंडा मतदारसंघात आजवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आली आहे. येथून राष्ट्रवादीचे राहूल मोटे हे तीन टर्म आमदार होते. मागच्या निवडणुकीत ते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून पराभूत झाले. दरम्यान, यावेळी ही जागा कोणी लढवायची, यावरुन मोठा पेच निर्माण झाला होता. राष्ट्रवादी व उद्धवसेना दोघेही या जागेसाठी आग्रही होते. मात्र, पेच सुटत नसल्याने गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी रणजीत पाटील यांना एबी फाॅर्म देऊन टाकला. ते परंड्यात येऊन अर्ज दाखल करण्यापूर्वीच शुक्रवारी शरद पवार गटाचे माजी आमदार राहूल मोटे यांनी पक्षाच्या एबी फाॅर्मसह अर्ज भरुन टाकला. यामुळे परंड्यावरुन आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वाढली आहे.
दोन्ही पक्ष लढण्यावर ठाम...
आघाडीतील दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. शुक्रवारी राहूल मोटे यांनी अर्ज भरला. रणजीत पाटीलही अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. उद्धवसेना व शरद पवार गट लढण्यावर ठाम आहेत.
एबी फाॅर्मसह अर्ज दाखल
माझ्या पक्षाच्या अधिकृत एबी फाॅर्मसह अर्ज दाखल केला आहे. मी लढण्यावर ठाम असून, ज्याअर्थी मला पक्षाने एबी फाॅर्म दिला आहे, त्याअर्थी पक्षाचीही आपल्या लढण्याला संमती आहे.
-राहूल मोटे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)