उपसरपंच बदलाच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:12 AM2021-02-05T08:12:11+5:302021-02-05T08:12:11+5:30
तेर : राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे समजले जाणारे व आ. राणा जगजितसिंह पाटील यांच गाव असलेल्या तेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळासाहेब कदम ...
तेर : राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे समजले जाणारे व आ. राणा जगजितसिंह पाटील यांच गाव असलेल्या तेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळासाहेब कदम यांनी पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्यांची विशेष मासिक सभा ५ फेब्रुवारी रोजी बोलाविण्यात आली आहे.
या ग्रामपंचायतीवर आ. राणा जगजितसिंह पाटील यांची एकहाती सत्ता आहे. १७ पैकी १५ सदस्य आमदार पाटील यांच्या गटाचे असून, सरपंचपद नवनाथ नाईकवाडी यांच्याकडे तर उपसरपंचपद बाळासाहेब कदम यांच्याकडे आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून उपसरपंचपदासाठी इतर काही इच्छुक सदस्यांनी आ. पाटील यांच्याकडे मागणी लावून धरली होती. यामुळे आ. पाटील यांनी उपसरपंच बाळासाहेब कदम यांना राजीनामा देण्याची सूचना दिली. त्यानुसार कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा आ. पाटील यांच्याकडे दिला होता. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून ५ फेब्रुवारीला विशेष मासिक सभेचे आयोजन केले आह. या सभेत राजीनाम्याची खातरजमा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे तेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच बदलाच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
चौकट.........
तीन वर्षांहून अधिक काळ होते कार्यरत
बाळासाहेब कदम हे तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून उपसरपंचपदावर कार्यरत असून, मध्यंतरी त्यांनी आठ महिने प्रभारी सरपंच पदाचाही कार्यभार सांभाळला. दरम्यान, काही सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी दोन-तीन वेळा सदस्यांची बैठक घेऊन अखेर कदम यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आता उपसरपंच पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.