'मागण्या मान्य करा, अन्यथा उड्या घेऊ'; धाराशिवमध्ये मराठा तरूण चढले कलेक्टर ऑफिसवर
By बाबुराव चव्हाण | Published: June 12, 2024 02:06 PM2024-06-12T14:06:46+5:302024-06-12T14:07:11+5:30
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जरांगे पाटील यांच्या उपाेषणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आंदोलकांचा आराेप
धाराशिव : मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे मागील चार दिवसांपासून उपाेषण सुरू आहे. मात्र, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मागण्यांकडे डाेळेझाक केली आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याचे सांगत संतप्त मराठा तरूणांनी बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून राेष व्यक्त केला. पाच वाजेपर्यंत मागण्यांचा विचार व्हावा, अन्यथा इमारतीवरून खाली उड्या घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
सगेसाेयऱ्यांचा अध्यादेश लागू करण्यात यावा, मराठा आंदाेलकांवरील केसेस मागे घेण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपाेषण सुरू केले आहे. चार दिवसांचा कालावधी लाेटूनही सरकारने आंदाेलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत दिवसागणिक खालावू लागली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जरांगे पाटील यांच्या उपाेषणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप करीत बुधवारी सकाळी जिल्ह्यातील मराठा तरूणांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून संताप व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांच्याविराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली. सरकारने सायंकाळी पाच वाजेपर्यंत मागण्यांच्या अनुषंगाने निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही इमारतीवरून खाली उड्या घेऊ, असा इशाराही तरूणांनी दिला आहे.