उस्मानाबाद येथे एक हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 08:20 PM2018-12-05T20:20:40+5:302018-12-05T20:21:08+5:30
एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना भिकार सारोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले.
उस्मानाबाद : एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना भिकार सारोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले.
उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील तक्रारदाराने स्वच्छ भारत योजनेअंतर्गत स्वच्छतागृहाची उभारणी केली होती. सदरील शौचालयाचे १२ हजार रूपये अनुदान स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत जमाही झाले होते. सदरील कामासोबतच तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेला प्लॉट नावे करणे व त्याचा फेर मंजूर करून सातबारा उतारा देण्यासाठी ग्रामसेवक अंगद मुंढे यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
पोलीस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांनी तक्रारीची शहानिशा करून बुधवारी सापळा रचला असता, तक्रारदाराकडून १ हजार रूपये स्वीकारताना ग्रामसेवक मुंढे यांना रंगेहात पकडण्यात आले. सदरील प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम २०१८ अंतर्गत मुंढे यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक गावडे हे करीत आहेत.