श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा लेखाधिकारी ६ लाखांची लाच घेताना रंगेहात अटकेत
By बाबुराव चव्हाण | Published: February 7, 2024 08:05 PM2024-02-07T20:05:01+5:302024-02-07T20:05:57+5:30
१० लाखांची मागणी केल्यानंतर सहा लाखांवर झाली हाेती तडजाेड
धाराशिव : तुळजापूर येथील सैनिक स्कूलचे वाॅल कंपाऊंड व इतर कामाचे बिल काढण्यासाठी सुमारे १० लाखांची मागणी करून तब्बल ६ लाख रूपये स्वीकारताना तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वित्त व लेखाधिकाऱ्यास रंगेहात पकडले. धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी ही कारवाई केली.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित सैनिक स्कूलच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजला, प्रवेशद्वार व संरक्षक भिंत बांधकामाचा सुमारे ३ काेटी ८८ लाखांचा ठेका तक्रारदारास मिळाला हाेता. हे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले आहे. पूर्ण झालेल्या या बांधकामाचे आजवर २ काेटी रूपयांपेक्षा जास्तीची बिले तपासणी करुन मंजुरीसाठी पाठवून मिळवून दिले व उर्वरित बिल तपासणी करुन मंजुरीस पाठविण्यासाठी संस्थानचे वित्त व लेखाधिकारी सिध्देश्वर मधुकर शिंदे यांनी ठेकेदाराकडे पंचासमक्ष सुमारे १० लाखांची मागणी केली हाेती. तडजाेडीअंती ६ लाख रूपये स्वीकारण्याचे मान्य केले.
दरम्यान, बिलासाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने ठेकेदाराने थेट लाचलुचतप प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. रितसर तक्रार आल्यानंतर ‘एसीबी’ने ३ फेब्रुवारी राेजी लाच मागणीची पडताळणी केली. खात्री झाल्यानंतर बुधवारी सापळा लावला असता, ठेकेदार तक्रारदाराकडून ६ लाख रूपये स्वीकारताना शिंदे यास रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी तुळजापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. ही कारवाई ‘एसीबी’चे पाेलीस उप अधीक्षक सिध्दराम म्हेत्रे यांच्या पथकाने केली.