खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:31 AM2021-03-21T04:31:20+5:302021-03-21T04:31:20+5:30
उस्मानाबाद तालुक्यातील सुंभा येथील आरोपी बालाजी नवनाथ सरवदे हा १९ मे २०१६ रोजी दुपारी गावातीलच मारुती मंदिरात झोपला होता. ...
उस्मानाबाद तालुक्यातील सुंभा येथील आरोपी बालाजी नवनाथ सरवदे हा १९ मे २०१६ रोजी दुपारी गावातीलच मारुती मंदिरात झोपला होता. तेव्हा बाबुराव बुर्ले यांनी सरवदे यास उठविण्याचा प्रयत्न केला. यावरून संतापलेल्या सरवदे याने बाबुराव बुर्ले यांच्याशी वाद घालून डोक्यात काठीने प्रहार केला. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या बुर्ले यांना मुरुड व नंतर लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना २० मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचा मुलगा देविदास बुर्ले यांनी २१ मे २०१६ रोजी बेंबळी ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार बालाजी सरवदेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक एन. आर. दंडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यावर अंतिम सुनावणी पूर्ण होऊन २० मार्च २०२१ रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी आरोपीस दोषी ग्राह्य धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच ३ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.