कळंब येथील ४३ खाजगी डाॅक्टरांची सेवा अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:35 AM2021-04-23T04:35:36+5:302021-04-23T04:35:36+5:30

कळंब येथे आ. कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रायगड मंगल कार्यालयात २०० खाटांचे कोविड केअर सेंटर चालू करण्याचा ...

Acquired the services of 43 private doctors at Kalamb | कळंब येथील ४३ खाजगी डाॅक्टरांची सेवा अधिग्रहित

कळंब येथील ४३ खाजगी डाॅक्टरांची सेवा अधिग्रहित

googlenewsNext

कळंब येथे आ. कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रायगड मंगल कार्यालयात २०० खाटांचे कोविड केअर सेंटर चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या उपजिल्हा रुग्णालय, आयटीआय वसतिगृह, सोजर शाळा येथे कोविड केअर सेंटर सुरू आहेत. याठिकाणी रुग्णांची वाढती संख्या पाहता उपजिल्हा रुग्णालयाकडे असलेले मनुष्यबळ कमी पडत आहे.

२०० खाटांचे कोविड सेंटर सुरू केल्यानंतर ही गरज वाढणार आहे. हे ध्यानात घेऊन कळंब शहरातील ४३ खाजगी डॉक्टरांची सेवा आपत्ती निवारण कायद्यानुसार उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी अधिग्रहित केल्याचे आदेश गुरुवारी निर्गमित केले. ही सेवा ३१ मेपर्यंत अधिग्रहित राहणार आहे. या डॉक्टरांना सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत कोविड सेंटरमध्ये ठरवून दिलेल्या दिवशी रुग्णांना तपासणे, औषधे देणे तसेच त्यांच्या प्रकृतीची नोंद ठेवावी लागणार आहे.

या मंडळींवर प्रभारी अधिकारी म्हणून डॉ. कमलाकर गायकवाड, डॉ. अभिजित जाधवर, डॉ. सुशील ढेंगळे, डॉ. सत्यप्रेम वारे, डॉ. दीपक कुंकूलोळ, डॉ. अभिजित लोंढे, डॉ. दिनकर मुळे हे काम पाहणार आहेत. तर नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे हे काम पाहतील.

सुविधा वाढविण्याची आवश्यकता

कळंबमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या खूप कमी आहे. व्हेंटिलेटर बेड एका हाताच्या बोटाएवढेच म्हणजे पाचच उपलब्ध आहेत. कोरोनाबाधित उपचाराधीन रुग्णांची संख्या पाचशेच्या घरात गेली आहे. गंभीर रुग्णांवर कळंब येथे उपचार करण्यावर यामुळे मर्यादा येत आहेत. त्यासाठी ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली तर अनेकांचे हाल होणार नाहीत. याकडे प्रशासनाने आता गांभीर्याने पाहिले नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते, असा इशारा वैद्यकीय क्षेत्रातून दिला जातो आहे.

रेमडेसिविरसाठी धावाधाव

गंभीर रुग्णांना रेमडेसिविरचे प्रिस्क्रिप्शन डॉक्टर मंडळींनी लिहून दिल्यानंतर ते कोठे मिळते यासाठी कुटुंबीयांची धावाधाव होते आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत फोन करूनही ते मिळत नसल्याने काहींनी रुग्णांना बार्शी, अंबाजोगाई, लातूर अशा ठिकाणी हलविले आहे. कळंबसाठी आज १२ रेमडेसिविर इंजेक्शन एका खाजगी रुग्णालयाला दिल्याची माहिती आज समाजमाध्यमावर फिरत होती. केवळ १२ इंजेक्शन नेमके कोणाला द्यायचे? इतरांनी काय करायचे? इंजेक्शन मुबलक प्रमाणात कधी मिळणार? असे प्रश्नही आता उपस्थित केले जात आहेत.

Web Title: Acquired the services of 43 private doctors at Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.