अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई ‘करो ना’; पोल्ट्री व्यवसायिकांची पोलिसांत धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 05:51 PM2020-02-11T17:51:42+5:302020-02-11T17:58:41+5:30
सायबर गुन्हे शाखेकडे धाव घेऊन अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे़
उस्मानाबाद : कोरोना व्हायरसच्या संदर्भाने सोशल मिडीयातून चिकनला बदनाम केले जात आहे़ त्यामुळे आपला व्यवसाय आर्थिक अडचणीत आला असून, अफवा पसरविणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी उस्मानाबादच्या पोल्ट्री व्यवसायिकांनी मंगळवारी पोलिसांकडे केली आहे़
कोरोना व्हायरसची सध्या सगळीकडेच चर्चा आहे़ उस्मानाबादमध्येही सोशल मिडीयातून यावर बरीच घुसळण सुरु आहे़ दरम्यान, काही वापरकर्त्यांकडून चिकन व अंडी खाल्ल्यानेही हा साथरोग बळावत असल्याचा दावा सोशल मिडीयातून केला जात आहे़ या दाव्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायिक चांगलेच संतापलेले दिसतात़ त्यांनी मंगळवारी थेट सायबर गुन्हे शाखेकडे धाव घेऊन अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे़
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत ते म्हणतात, उस्मानाबाद जिल्ह्यात कुक्कुटपालन हा मुख्य व जोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो़ या व्यवसायावर शेतकरी, चिकन विक्रेते, व्यापारी, औषध विक्रेते, अशा अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे़ मात्र, हल्ली कोरोना व्हायरस हा चिकन व अंडीतूनही बळावला जात असल्याच्या अफवा सोशल मिडीयातून पसरविण्यात येत आहेत़ त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे़ शिावाय, त्यावर अवलंबून असलेल्या अन्य घटकांचेही नुकसान होत आहे़ कर्जबाजारीपणा वाढत आहे़ सोशल मिडीयातून तथ्य नसतानाही चिकन व अंडीला बदनाम करुन आमच्या व्यवसाय गंडांतर आणले जात असून, अफवा पसरविणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही उस्मानाबाद जिल्हा पोल्ट्री असोशिएशनने केली आहे़ यावेळी संघटनेचे अध्यक्ष एस़ए़ जंत्रे, उपाध्यक्ष एम़एस़ डोईफोडे, सचिव एम़आऱ वरपे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते़