छोट्या व्यावसायिकांचाही प्रशासनाने विचार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:29 AM2021-05-22T04:29:39+5:302021-05-22T04:29:39+5:30
लोहारा : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे छोटे व्यावसायिक सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे या दुकानदारांना व्यवसाय चालू ...
लोहारा : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे छोटे व्यावसायिक सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे या दुकानदारांना व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील मजूर, एकल महिला तसेच हातावर पोट असणारे छोटे व्यावसायिक यांचे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला जनता कर्फ्यू असल्याने नासून जात आहे. यातील बहुतांश जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालत असल्याने सद्य:स्थितीत त्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या छोट्या व्यवसायधारकांचा विचार करून फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे व्यवसायधारक, किराणा, हॉटेल व्यवसाय, टपरीधारक यांना तत्काळ मुभा देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आयुब शेख, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, माजी नगरसेवक गगन माळवदकर, स्वप्नील माटे आदी उपस्थित होते.