प्रशासन, सामाजिक संस्था फ्रंटलाईनवर, पुढारी बॅकफूटवर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:32 AM2021-05-10T04:32:30+5:302021-05-10T04:32:30+5:30

समीर सुतके लोकमत न्यूज नेटवर्क उमरगा : शहरात एकीकडे प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करून काेराेना थाेपविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...

Administration, social organizations on the frontline, leaders on the backfoot ... | प्रशासन, सामाजिक संस्था फ्रंटलाईनवर, पुढारी बॅकफूटवर...

प्रशासन, सामाजिक संस्था फ्रंटलाईनवर, पुढारी बॅकफूटवर...

googlenewsNext

समीर सुतके

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरगा : शहरात एकीकडे प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करून काेराेना थाेपविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सामाजिक संघटना व संस्थाही प्रशासनाच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. परंतु, जनतेच्या हिताच्या गप्पा मारून मतांच्या जाेगव्यावर सत्तेच्या खुर्चीत बसलेले पालिकेतील पदाधिकारी गेले कुणीकडे? असे म्हणण्याची वेळ उमरगेकरांवर येऊन ठेपली आहे. पदाधिकाऱ्यांच्या अशा भूमिकेच्या अनुषंगाने नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव उमरगा शहरात जानेवारीपासून जाणवू लागला. शहरातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. याची जाणीव झाल्याबरोबर पालिका प्रशासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. त्यानुसार ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत आतापर्यंत शहरातील ७ हजार २७६ घरातील ३३ हजार २७० नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. घराेघरी जाऊन जनजागृती करण्यात आली. लक्षणे असलेल्या व्यक्तींना दवाखान्यापर्यंत नेऊन चाचण्या केल्या. साेबतच शहरात नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन, मास्क वापर न करणाऱ्यांवर कारवाई, कन्टेनमेंट झोन करणे, लॉकडाऊन काळात नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी आवश्यक उपायाेजना केल्या आहेत. पालिकेच्या या प्रयत्नांना महसूल व पोलीस यंत्रणेचीही खंबीर साथ मिळत आहे. पालिका प्रशासन त्यांच्यापरीने चांगली सेवा देण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे पालिकेतील निर्वाचित पुढारी कोणत्याही भूमिकेत दिसून येत नाहीत. महिनाभरापासून शहरात लॉकडाऊनची स्थिती आहे. सर्व दैनंदिन व्यवहार बंद आहेत. फेब्रुवारीपासून आतापर्यंत शहरात ६१० रुग्ण आढळले असून, २७ जणांचा मृत्यू झाला आहे. गरीब लोकांच्या हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना रुग्णांना उपचार वेळेवर मिळत नाहीत. गरजेवेळी ऑक्सिजन मिळत नाही. मदतीसाठी लाेक धावा करत आहेत. हे सर्व विदारक चित्र शहरामध्ये असतानाही ‘संकटात जनतेच्या साेबत राहू. विकासात कमी पडणार नाही’, अशी नानाविध आश्वासने देऊन सत्तेची खुर्ची पटकावलेले पदाधिकारी सध्या काेणत्याच माेहिमेवर दिसत नाहीत, हे विशेष. त्यामुळे पदाधिकारी गेले कुणीकडे? असे म्हणण्याची वेळ आता लाेकांवर आली आहे.

संस्था, संघटनांकडून प्रयत्न...

काेराेना महामारीच्या काळात पालिका पदाधिकाऱ्यांनी जनतेकडे पाठ फिरवली आहे. मात्र, दुसरीकडे पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटना फ्रंटफूटवर असल्याचे दिसते. शहरातील इदगाह काेविड सेंटर मुस्लिम तरूण चालवत आहेत. माऊली सामाजिक संघटनेकडूनही काेविड सेंटर उत्तमरित्या चालवले जात आहे. युवा सेनेचे किरण गायकवाड हेही आपल्या सहकाऱ्यांना साेबत घेऊन काेविड सेंटरमधील सुविधांचा आढावा घेत आहेत. तसेच गाेरगरीब जनतेला अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येत आहे. तसेच समर्थ अन्नसेवा मंडळ, संविधान विचार मंच आदी संघटना, संस्थाही मदतीसाठी सरसावल्या आहेत.

लाेक म्हणताहेत...

काेराेनामुळे लाेक अडचणीत आहेत. एखाद्या घरामध्ये काेराेनाबाधित आढळून आल्यास काय करावे, हे सुचत नाही. दवाखान्यात गेल्यास बेड मिळत नाहीत. अशा काळात संबंधित प्रभागामधील नगरसेवक अथवा पालिकेतील अन्य पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी धावून आले पाहिजे. परंतु, असे काहीच घडत नाही. त्यामुळे मतदान मागायला आल्यानंतर संबंधित मंडळींना निश्चित जाब विचारला जाईल, असे काही लाेकांकडून सांगण्यात आले.

Web Title: Administration, social organizations on the frontline, leaders on the backfoot ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.