दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी नियमावली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 12:00 PM2021-10-01T12:00:00+5:302021-10-01T12:00:21+5:30
7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे
उस्मानाबाद/मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली राज्यातील सर्व मंदिरे ७ ऑक्टोबरपासून म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे, राज्यातील भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर, आदिशक्तीपीठ असलेल्या कोल्हापूर, तुळजापूरसह विविध देवींच्या भक्तांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, कोविड नियमावलींचे पालन करुनच भाविकांना मंदिरात प्रवेश वा दर्शन मिळणार आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील दर्शनासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचेही दर्शन भक्तांना घेता येईल. मात्र, त्यासाठी मंदिर संस्थान आणि प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावलींचे पालन करावे लागणार आहे. 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, दररोज पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत या काळात 15 हजार भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
अशी आहे नियमावली
दररोज 15 हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश
परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांनाच जिल्ह्यात प्रवेश
लसीकरण न झालेल्या भाविकांना 72 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर अहवाल दाखवणे बंधनकारक
गर्दी न करता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन बंधनकारक
चेहऱ्यावर मास्क असणे बंधनकारक
सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक
नवरात्रौत्सवात कोजागिरी पौर्णिमा रद्द
18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात बंदी, तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश नाही
तुळजाभवानी मंदिरात 65 वर्षांवरील नागरिकांना तसेच गरोदर स्त्रिया आणि 10 वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही
भाविकांना केवळ मंदिरात प्रवेश, अभिषेक आणि इतर विधींना परवानगी नाही
ऑनलाईन दर्शनाचीही सोय
नवरात्रीत तुळजाभवानी मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे तासाला किती भाविकांना सोडायचे, मंदिर किती वेळ सुरू ठेवायचे याचे नियोजन करण्यात येत आहे. याशिवाय भाविकांना घरबसल्या देवीचे दर्शन तसेच दैनंदिन धार्मिक विधी पाहता यावेत याकरिता चॅनेलवरून लाईव्ह दर्शनाची सोयही करण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाची साथ पसरल्यानंतर राज्यातील प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली होती. जवळपास गेल्या 1.5 वर्षांपासून ही प्रार्थनास्थळे बंद होती. मात्र, राज्य सरकारने नवरात्री उत्सवाच्या पहिल्याच दिवशी ही प्रार्थनास्थळे मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे.