गूढ आवाजा पाठोपाठ जोरदार हाद-याने उस्मानाबाद जिल्हा हादरला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 01:20 PM2017-12-12T13:20:48+5:302017-12-12T14:08:56+5:30
घरांमध्ये सकाळची धांदल सुरु असतानाच जिल्ह्यात गूढ आवाजाचा जोरदार हादरा नागरिकांना जाणवला. आज सकाळी ८ वाजून ५७ मिनिटाला बसलेल्या या हाद-याने नागरिक भयभीत झाले.
उस्मानाबाद : घरांमध्ये सकाळची धांदल सुरु असतानाच जिल्ह्यात गूढ आवाजाचा जोरदार हादरा नागरिकांना जाणवला. आज सकाळी ८ वाजून ५७ मिनिटाला बसलेल्या या हाद-याने नागरिक भयभीत झाले.
मंगळवारी लग्नतिथी असल्याने सकाळपासूनच फटाके, बँडचे आवाज शहरांमध्ये घुमत होते़ यातच ९ वाजण्याच्या सुमारास एक जोरदार आवाज हाद-यासह जाणवला़ शहरातील अनेकांनी हा आवाज मोठ्या फटाक्याचा असावा, असा अंदाज लावला़ तर ज्या भागात लग्नकार्य नव्हते तेथेही हा जोरदार आवाज झाल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली़ भ्रमणध्वनी व सोशल माध्यमांतून या आवाजाची चर्चा झाल्याने भयात आणखीच भर पडली़ मंगळवारचा हा प्रकार उस्मानाबाद शहर, लासोना, समुद्रवाणी, तेर, वडगाव, लोहारा, माकणी, काक्रंबा व जिल्ह्यातील अन्य भागातही जाणवला़ दरम्यान, सोमवारी भूम तालुक्यातील बहुतांश भागात असाच आवाज झाला होता.
वायूचे बाष्पीभवन, भूवैज्ञानिकांचे मत
भूगर्भातील वायूच्या बाष्पीभवनामुळे असे प्रकार जिल्ह्यात नेहमीच घडत आलेले आहेत़ मंगळवारचा आवाजही या बाष्पीभवनानेच झाल्याचा आमचा प्राथमिक निष्कर्ष आहे़ यात घाबरुन जाण्यासारखे काही नाही, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक पी़एस़ पौळ यांनी दिली़