परंडा पाठोपाठ तुळजापुरातही उमेदवारांकडून ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 07:37 PM2024-12-02T19:37:37+5:302024-12-02T19:38:47+5:30
निकालानंतर ७ दिवसांच्या आत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांनाच मतदान पडताळणीची मागणी करता येते.
धाराशिव : नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय असल्याने पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. यात परंडा मतदारसंघातून राहुल मोटे यांनी १७ तर वंचितचे प्रवीण रणबागुल यांनी एका मशीनच्या पडताळणीची मागणी केली आहे. दरम्यान, तुळजापूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार धीरज पाटील यांनीही तीन मशीनच्या पडताळणीची मागणी करीत त्यासाठीचे शुल्क भरले आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे हे शिंदेसेनेचे तानाजी सावंत यांच्याकडून अवघ्या १५०९ मतांनी पराभूत झाले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सावंत यांना विजयाचे प्रमाणपत्रही देऊ केले आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीनवर संशय असल्याने राहुल मोटे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आयोगाच्या तरतुदीनुसार १७ ईव्हीएममधील बर्न्ट मेमरीची पडताळणी करण्याची लेखी मागणी केली आहे. यासाठी आवश्यक असलेले प्रति मशीन ४७ हजार २०० रुपयांचे शुल्कही त्यांनी भरले आहे. तसेच याच मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल यांनीही एका मशीनच्या पडताळणीची मागणी केली आहे. दरम्यान, तुळजापूर मतदारसंघातील ३ मशीनच्या पडताळणीसाठी काँग्रेसचे पराभूत उमेदवार धीरज पाटील यांनी शुल्क भरून मागणी केली आहे.
अशी आहे प्रक्रिया अन् तरतूद...
निकालानंतर ७ दिवसांच्या आत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांनाच मतदान पडताळणीची मागणी करता येते. त्यांच्याकडून एकूण मतदान केंद्राच्या ५ टक्के इतक्याच केंद्रावरील मशीनची पडताळणी मागता येते, अशी तरतूद आहे. त्यानुसार परंडा मतदारसंघात ५ टक्के प्रमाणे १८ केंद्र होतात. या सर्व १८ केंद्रांच्या पडताळणीची मागणी करण्यात आली आहे. तुळजापूरमध्ये ५ टक्केप्रमाणे २० केंद्र होतात. मात्र, धीरज पाटील यांनी केवळ ३ केंद्रांची मागणी केली आहे.
आता पुढे काय होणार...
उमेदवारांकडून प्राप्त झालेले अर्ज ५ दिवसांत निवडणूक आयोगाकडे पाठविले जातील. यानंतर आयोगाकडून ईव्हीएम निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना तंत्रज्ञ, अभियंत्यांना पडताळणीसाठी संबंधित मतदारसंघात पाठविण्याची सूचना केली जाईल. कंपनीकडून मिळणाऱ्या तारखेनुसार संबंधित मतदारसंघातील मागणी केलेल्या ईव्हीएममधील बर्न्ट मेमरीची पडताळणी केली जाईल. ही सर्व प्रक्रिया ४५ दिवसांच्या आत करावी लागेल. त्यामुळे पडताळणीनंतर काय अहवाल समोर येतो, याकडे मतदारांचे लक्ष असणार आहे.