उमरग्याचा मृत्युदर पाेहाेचला ६.४२ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:31 AM2021-05-01T04:31:44+5:302021-05-01T04:31:44+5:30
उमरगा : उमरगा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजेच मागील दोन ...
उमरगा : उमरगा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजेच मागील दोन महिन्यांत १ हजार ९०० लोकांना कोरोना संसर्ग झाला. यापैकी १२० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी मृत्युदर ६.४२ टक्के झाला आहे. शुक्रवारी तालुक्यात १० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्चपासून कोरोनाचे रुग्ण तालुक्यात झपाट्याने वाढत आहेत. मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत १ हजार ९०० व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पहिल्या कोरोना लाटेत एक वर्षात १ हजार ९८० व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला होता. पहिल्या कोरोना लाटेत वर्षभरात २८ कोरोनाबधितांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या लाटेत अवघ्या दोन महिन्यांत १२२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पहिल्या लाटेत १.४१ टक्के असलेला मृत्युदर दुसऱ्या लाटेत ६.४२ झाला आहे. मृतांमध्ये ६० वर्षांवरील वृद्ध व मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
उमरगा शहरात वाढत्या कोविड रुग्णांची संख्या विचारात घेऊन उपजिल्हा रुग्णालय केवळ कोविड रुग्णालय करण्यात आले आहे. याबरोबर गजानन रुग्णालय, डॉ. के.डी. शेंडगे रुग्णालय, शिवाई रुग्णालय, विजय क्लिनिक, माउली रुग्णालय, मातृछाया रुग्णालय या खासगी रुग्णालयास कोविड रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या ठिकाणी १५३ साधे बेड तर ११० ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत.
चाैकट...
मुरूम ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी घेण्यात आलेल्या ५२ रॅपिड अँटिजेन टेस्टपैकी १० व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात ६१ रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये १२ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे घेण्यात आलेल्या ८३ रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये २३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. उपजिल्हा रुग्णालयातून पाठवलेल्या ३२ स्वॅबचे अहवालही आले आहेत. त्यात ११ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
सध्या उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे १०३, ईदगाह कोरोना केअर सेेटरमध्ये २९, शिवाई हॉस्पिटलमध्ये २४, शेंडगे हाॅस्पिटल २६, शिवाजी कॉलेज हॉस्टेल २४, गजानन हॉस्पिटलमध्ये ९, मातृछाया हॉस्पिटलमध्ये ८, आईसाहेब मंगल कार्यालय ५८, होम आयसोलेशनमध्ये १५८ रुग्ण आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके व मुरूमचे वैद्यकीय अधीक्षक वसंत बाबरे यांनी दिली.