गर्भलिंग निदानासाठी महिला नेताना एजंट जाळ्यात; पुन्हा गुलबर्गा कनेक्शन उघड
By चेतनकुमार धनुरे | Published: April 7, 2023 12:49 PM2023-04-07T12:49:15+5:302023-04-07T12:50:14+5:30
यापूर्वी झालेल्या कारवाईत गुलबर्गा येथील एका डॉक्टर व एजंटाचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा गुलबर्गा येथूनच गर्भलिंग निदानाचा खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे.
धाराशिव : जिल्ह्यातील गर्भलिंग निदानाचे रॅकेट उघड करण्यात पुन्हा एकदा पोलिस व आरोग्य विभागाला यश आले आहे. पहाटेच्या वेळी गर्भवती महिलांना उमरगा येथे बोलावून तेथून कर्नाटकात रवाना होण्याच्या तयारीत असलेल्या एजंटला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
गर्भलिंग निदानाचे कर्नाटक कनेक्शन आरोग्य विभागाने काही महिन्यांपूर्वीच एका स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणले होते. त्यापाठोपाठ पुन्हा एक टोळी नव्याने कार्यरत झाली. याची कुणकुण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना लागली. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अतुल कुलकर्णी व अपर अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकातील डॉ. दत्तात्रय खुने, विधी विभागाच्या ॲड. रेणुका शेटे यांच्याशी चर्चा करून जाळे विणण्यास सुरुवात केली.
जवळपास महिनाभराच्या तयारीनंतर एक डमी गर्भवती महिला एजंटाकडे पाठवून बोलणी केली. त्याने २० हजार रुपयांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे २० हजार रुपये सोबत घेऊन ही डमी गर्भवती महिला बुधवारी पहाटे उमरगा चौरस्ता येथे पोहोचली. तेथे तिने एजंटाकडे पैसे दिले. इतरही काही गर्भवती महिला आल्यानंतर एका जीपमधून त्यांना कर्नाटकात नेण्याची तयारी सुरू असतानाच पोलिस व आरोग्य विभागाच्या पथकाने एजंटाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लिंग निदानासाठी घेतलेली रोकड, मोबाइल, काही डॉक्टरांचे मोबाइल क्रमांक, पत्ते असलेली डायरी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी उमरगा येथील वैद्यकीय अधीक्षकांमार्फत तक्रार तयार करण्यात येत असून, त्यानुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पुन्हा गुलबर्गा कनेक्शन...
यापूर्वी झालेल्या कारवाईत गुलबर्गा येथील एका डॉक्टर व एजंटाचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा गुलबर्गा येथूनच गर्भलिंग निदानाचा खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. हे एजंट व त्याचे काही हस्तक जिल्ह्यातील गरजू गर्भवतींचा शोध घेऊन त्यांना सीमाभागातील चौरस्ता येथे पहाटेच बोलावून गुलबर्गा येथे नेत असल्याचेही स्पष्ट झाले.