कृषी सहायकाचे निलंबन मागे घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचे आक्रमक आंदोलन
By सूरज पाचपिंडे | Published: June 21, 2023 03:25 PM2023-06-21T15:25:37+5:302023-06-21T15:26:10+5:30
फक्त एक शेतकऱ्यास विलंबाने काही निवीष्ठा वाटप केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई केली आहे.
धाराशिव : भूम तालुक्यातील तिंत्रज येथील कृषी सहायकावर निलंबनाची कारवाई झाली आहे. या कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक व कृषी पर्यवेक्ष संघटनेच्यावतीने बुधवारी काम बंद ठेवून मध्यवर्ती प्रशासकीय इमारती समोर धरणे आंदोलन केले.
तिंत्रज येथील कृषी सहायक पी.एम. चंदनशिवे यांच्याकडून निवीष्ठा वेळेत वाटप न झाल्याच्या काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक यांनी संबंधित कृषी सहायक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन निलंबनाचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप करीत कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षकांनी बुधवारी काम बंद ठेवत आंदोलन केले. आंदोलनामध्ये सहभागी झालेले कृषी कर्मचाऱ्याची म्हणाले, तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. प्रात्यक्षिकातील निवड झालेल्या २५ शेतकऱ्यापैकी २४ शेतकऱ्यांना वेळेत निवीष्ठा वाटप करण्यात आल्या होत्या. चौकशी समितीसमोर २४ पैकी १३ शेतकऱ्यांनी उपस्थित राहून निवीष्ठा वेळेत प्राप्त झाल्याचा जबाब दिला होता. तर उर्वरित शेतकरी त्यांच्या वैयक्तिक कामकाजामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.
फक्त एक शेतकऱ्यास विलंबाने काही निवीष्ठा वाटप केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई केली आहे. कृषी सहायकाचे निलंबन असून ते मागे घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी लावून धरली होती. आंदोलनात आनंद आवारे, राहुल सुर्यवंशी, राकेश माकोडे, गिरीष कुलकर्णी, नितीन पाटील, दत्तात्रय मोहिते, विजय पुरी, सुषमा यादव, राणी शिंदे, अलका सांगळे यांच्यासह कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक सहभागी झाले होते.