मराठा बांधव आक्रमक, कळंबमध्ये मुख्यरस्त्यावर टायर जाळले; रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प
By बाबुराव चव्हाण | Published: February 14, 2024 01:46 PM2024-02-14T13:46:03+5:302024-02-14T13:55:40+5:30
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटी येथे पुनश्च आमरण उपोषण सुरू झाले आहे
कळंब (जि. धाराशिव) : मनोज जरंगे यांची प्रकृती खालावली आहे. असे असतानाही सरकार याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या कळंब येथील सकल मराठा समाजाने बीड धाराशीव जिल्ह्याच्या सीमेवरील मांजरा नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. विदर्भ , मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र यांचा कनेक्टिंग पॉईंट असलेल्या पुलावरील रास्ता रोकोमूळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत . आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण आहे .
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटी येथे पुनश्च आमरण उपोषण सुरू झाले आहे . याचा पाचवा दिवस आहे, अन्नपाणी त्याग केलेल्या जरंगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठीच सोमवारी कळंब येथे आठवडी बाजाराचा दिवस असतानाही बंद पाळण्यात आला होता . आता सरकारने जरंगे पाटील यांच्या आंदोलनाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे या मागणीसाठी कळंब येथे आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे .
यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे आंदोलक उपस्थित आहेत . सरकारवर रोष व्यक्त करणार्या घोषणा दिल्या जात आहेत . नायब तहसीलदार मुस्ताफा खोंदे , मंडळ अधिकारी टी.डी.मटके यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी ठाण मांडून आहे.
प्रमूख रस्त्यावर नाकाबंदी ...
कळंब येथील मांजरा नदीवरचा पूल हा कळंब अंबाजोगाई , परळी तसेच कळंब केज धारूर माजलगाव , कळंब येरमाळा बार्शी अशा राज्य , राष्ट्रीय महामार्गाला कनेक्ट आहे. विदर्भाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार्या शेगाव पंढरपूर मार्ग याच पुलावरून जातो. नेमका याच पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे . यामुळे मोठ्या वर्दळीच्या मार्गावर एकाअर्थाने नाकाबंदी झाली आहे .
टायरची जाळपोळ , वाहनांच्या रांगा ...
दरम्यान , आंदोलनस्थळी टायर जाळण्यात आले आहेत . यामुळे जाळ अन् धुराचे लोट निघत आहेत. कळंब शहराकडे व नदीपल्याडच्या केज तालुका हद्दीत तीन किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या आहेत . जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला जात आहे