तुळजाभवानी देवीच्या द्वारासमोरील आंदोलन जमावबंदी आदेशाने गुंडाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 03:04 PM2020-11-07T15:04:59+5:302020-11-07T15:06:43+5:30
तुळजाभवानी महाद्वारासमोर आध्यात्मिक समन्वय आघाडीने राज्यातील साधू-संतांच्या उपस्थितीत गुरुवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते.
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने तुळजापुरात तुळजाभवानी मंदिरासमोर गुरुवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. मात्र, मध्यरात्रीपासून मंदिर परिसरात जमावबंदी आदेश लागू केल्याने पोलिसांनी आंदोलनस्थळावरील तंबू रातोरात गुंडाळला. परिणामी, हे आंदोलनही तुळजापुरातून गंडाळले. मात्र, राज्यात अन्य ठिकाणी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आघाडीने स्पष्ट केले.
तुळजाभवानी महाद्वारासमोर आध्यात्मिक समन्वय आघाडीने राज्यातील साधू-संतांच्या उपस्थितीत गुरुवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते. शुक्रवारी आंदोलनस्थळी महाचंडीयाग यज्ञ करण्याचे नियोजन करण्यात आले होते; परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने मंदिर परिसरात कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश लागू केले. याबाबत आंदोलकांना नोटिसा देण्यात आल्या. दरम्यान, पोलिसांनीही हे आदेश लागू होताच रातोरात आंदोलन स्थळावरील तंबू गुंडाळला. यानंतर आंदोलकांनी पत्रकार परिषद घेऊन आपले आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकारने केल्याची टीका करीत, यापुढेही हे आंदोलन राज्याच्या अन्य भागात सुरूच ठेवण्याचा निर्धार बोलून दाखविला. दरम्यान, शुक्रवारी आंदोलनासाठी आलेले अध्यक्ष तुषार भोसले यांच्यासह नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, विशाल रोचकरी, इंद्रजित साळुंके, नितीन काळे, आनंद कंदले, अविनाश गंगणे, संतोष बोबडे यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही तर दडपशाही -तुषार भोसले
तुळजापुरातील आंदोलन मागे न घेता ते स्थगित केले असून राज्यातील सर्व मंदिरे जोपर्यंत उघडत नाहीत, तोपर्यंत राज्यभर समितीचे आंदोलन चालूच राहणार आहे, असे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्य शासनाच्या दडपशाहीचा निषेधही नाेंदवला.