पडक्या इमारतीतून चालतो ‘कृषी’चा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:34 AM2021-08-22T04:34:57+5:302021-08-22T04:34:57+5:30
तामलवाडी : शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळावा, शेतीविषयक सल्ला गावातच घेता यावा, यासाठी तुळजापूर तालुक्यातील काटी येथे कृषी ...
तामलवाडी : शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळावा, शेतीविषयक सल्ला गावातच घेता यावा, यासाठी तुळजापूर तालुक्यातील काटी येथे कृषी विभागाच्यावतीने मंडळ कृषी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. परंतु, सद्यस्थितीत या कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, कार्यालयाच्या भिंती कधी ढासळतील याची शाश्वती राहिलेली नाही.
काटी गावात कृषी विभागाच्यावतीने १५ वर्षांपूर्वी मंडळ कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. हे कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयालगत असलेल्या एका इमारतीत सुरू करण्यात आले. या कार्यालयातून ३० गावांना कृषी विभागाच्या योजना व शेती सल्लाही दिला जातो. परंतु, येथील मंडळ कृषी अधिकाऱ्यांची बदली होऊन तीन वर्षे उलटली तरीही रिक्त जागा अद्याप भरलेली नाही. शिवाय, ३० गावांचा कारभार १२ कृषी सहाय्यकांवर अवलंबून आहे.
या कार्यालय इमारतीच्या भिंती फुगल्या असून, त्या कधी ढासळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे दर आठवड्याला होणारी कृषी सहाय्यकाची बैठकही आता तुळजापूर तालुका कृषी कार्यालयात घ्यावी लागत आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागाच्या योजना गावपातळीवर कशा पोहोचणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासाठी नव्या इमारतीत कार्यालयाचे स्थलांतर करून मंडळ कृषी कार्यालयाच्या कामकाजाची सुरूवात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
चौकट .
लवकरच स्थलांतर
अस्तित्वात असलेल्या कार्यालयाची इमारत वापरण्यायोग्य नाही. या इमारतीच्या भिंती फुगल्या आहेत. त्यात कृषी सहाय्यकाच्या बैठका कशा घ्यायच्या? त्यामुळे थोड्या दिवसात येथील कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात येईल.
- आनंद पाटील, प्रभारी मंडळ अधिकारी, काटी