आंदोलकांची पोलीस ठाण्यासमोर प्रातिनिधिक स्वरूपात दारूविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 05:46 PM2019-09-17T17:46:05+5:302019-09-17T17:50:26+5:30
अवैध दारूविक्रेत्यावर कारवाई करा
कळंब : तालुक्यातील मोहा येथील अवैध दारूविक्री बंद करावी, या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन सेना व वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कळंब पोलीस ठाण्यासमोरील भागात प्रातिनिधिक स्वरूपात दारू विक्री आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली होती.
तालुक्यातील मोहा हे लोकसंख्या व आकाराने मोठे असलेले गाव आहे.येथील भीमनगरसह अन्य काही भागात अवैध दारूची सर्रास विक्री केली जात होती. याचा स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच वारंवार सामाजिक शांतता भंग होण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, ग्रामसभा, पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभागाला कळवून अवैध दारूविक्री बंद करावी अशी मागणी केली होती. याविषयी स्थानिकांनी जवळपास १२ अर्ज दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वारंवार मागणी करुनही व तंटामुक्ती समिती ते ग्रामसभा असा दारू विक्री विरोधात आवाज उठवूनही मोहा येथील भीमनगर व गावातील इतर भागातील दारू विक्रेते जुमानण्यास तयार नव्हते. कारवाई गेल्यानंतर काही अवधीतच पुन्हा विक्री सुरू होत होती.
यामुळे रिपब्लिकन सेनेने मागच्या पंधरवड्यात मोहा येथील अवैध दारू विक्री बंद करावी अन्यथा पोलीस ठाण्याच्यासमोर दारू विक्री व उपोषण असे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे, वंचीत बहुजन आघाडीच्या युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष लाखन गायकवाड, अरूण गरड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी नऊ वाजता कळंब पोलीस ठाण्यासमोरील येरमाळा रस्त्यालगत प्रातिनिधीक स्वरूपात दारू विक्री व उपोषण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रसुल पठाण,सुरज वाघमारे, बाबा कसबे, प्रविण कसबे, मनोज भुंबे, विशाल वाघमारे, शालन हिरवे, इंदुबाई कसबे, रूक्मिनी कसबे, मंदाबाई कसबे, आशा कसबे, विमल कसबे, आशा शिंदे आशा गाडे, सुशिला कसबे आदी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
रिपब्लिकन सेना व वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली मोहा येथील अवैध दारूविक्री विरोधात कळंब येथे प्रातिनिधीक स्वरूपात दारू विक्री व उपोषण आंदोलन सुरू झाले. यात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. शिवाय आंदोलनकर्त्यांनी दारूच्या रिकाम्या बाटल्या समोर मांडल्या होत्या. येथे दारू मिळेल असे ‘कॅन’ ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांनी अवैध दारू विक्री बंद करावी, संबंधित व्यक्ति दाद नेत नसेल तर हद्दपार करावे अशा आग्रही मागण्या केल्या. शेवटी दुपारच्या सुमारास पोनि तानाजी दराडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व निवेदन स्विकारले. तसेच कारवाईचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.