तुळजाभवानीचा अभिषेक कर ५० रुपयांवरून ५०० रुपये निर्णयास तिन्ही पुजारी मंडळांचा विरोध
By चेतनकुमार धनुरे | Published: July 24, 2023 05:10 PM2023-07-24T17:10:24+5:302023-07-24T17:11:02+5:30
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मे महिन्यात झालेल्या विश्वस्त बैठकीत अभिषेक कर हा ५० रुपयांवरून ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास मंजुरीही मिळाली आहे.
तुळजापूर (जि. धाराशिव) : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने अभिषेक कर वाढीचा ठराव घेतला आहे. त्यास पुजारी मंडळांकडून विरोध होत असून, सोमवारी झालेल्या बैठकीत या पुजारी मंडळांनी हा ठराव रद्द करण्याची एकमुखी मागणी केली आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मे महिन्यात झालेल्या विश्वस्त बैठकीत अभिषेक कर हा ५० रुपयांवरून ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास मंजुरीही मिळाली आहे. याअनुषंगाने करवाढीवर दि. १० जुलै रोजीपासून अंमलबजावणी करण्याचे निर्देश मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी दिले होते. यानंतर शहरातील सर्व माजी नगरसेवकांनी विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेऊन भाविकांना भुर्दंड ठरणारी अभिषेक करवाढ मागे घेण्याची मागणी केली.
पुजारी मंडळांकडूनही अशीच मागणी करण्यात आली होती. यावर जिल्हाधिकारी यांनी या करवाढीला स्थगिती देऊन मंदिरातील तिन्ही पुजारी मंडळाला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. याअनुषंगाने दि. २४ जुलै रोजी रोजी व्यवस्थापक संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भोपे पुजारी मंडळ, पाळीकर पुजारी मंडळ व उपाध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात तिन्ही पुजारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिषेक करवाढीस तीव्र विरोध करून तो ठराव रद्द करावा, अशी एकमुखी मागणी केली.