उस्मानाबाद जिल्ह्यातील अख्खं गाव फणफणलंय गोचिड तापीने !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 07:21 PM2018-10-10T19:21:40+5:302018-10-10T19:22:56+5:30
जवळपास ९०० लोकसंख्या असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कपिलापुरी गावास सध्या गोचिड तापीने त्रस्त केले आहे़
परंडा (उस्मानाबाद) : जवळपास ९०० लोकसंख्या असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कपिलापुरी गावास सध्या गोचिड तापीने त्रस्त केले आहे़ थोडथोडके नव्हे तर सातशेहून अधिक ग्रामस्थ या आजाराने फणफणले आहेत. दरम्यान, आठवडाभरात याच तापीने दोघांचा बळी गेल्याची ओरड ग्रामस्थांमधून झाल्यानंतर आज आरोग्य विभागाच्या पथकाने गावात जावून रक्त तपासणी सुरु केली आहे़
गेल्या दहा दिवसापासून कपिलापुरी गावातील ग्रामस्थ तापीने आजारी पडत आहेत़ एकापाठोपाठ अशा तब्बल सातशेहून जास्त ग्रामस्थंना या आजाराने घेरले आहे़ परंडा शहरातील सर्वच खाजगी आणि सरकारी दवाखान्यामध्ये कपिलापुरीतील रुग्णांची अधिक गर्दी झाली आहे़ त्यातच आठवडाभरात गावातील दोन रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे़शिवाय, दोघे गंभीर असून, त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ सबंध गाव तापीने फणफणले असतानाही आरोग्य विभागाने लक्ष दिले नसल्याचाही आरोप ग्रामस्थ बाळासाहेब पाटील यांनी केला़
दरम्यान, ही बाब आमदार राहुल मोटे यांना समजताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिका-यांना संपर्क करुन पथक पाठविण्याच्या सूचना केल्या़ यानंतर बुधवारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जहूर सय्यद, आसू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय आधिकारी डॉ. महमंद साचे यांच्यासमवेत आरोग्य पथक कपिलापुरीत दाखल झाले. त्यांनी गावाची पाहणी करुन अबेटिंग केले़ तसेच ग्रामस्थांच्या रक्ताच्या नमुने तपासणीसाठी घेतले आहेत़ एका पथकाद्वारे गावातच उपचार सुरु करण्यात आले आहेत़ तूर्त ग्रामस्थांनी परिसर स्वच्छ ठेवावा व पशुधन घरापासून दूर बांधावेत, अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत़
असा होतो संसर्ग...
कपिलापुरी गावात बहुतांश घरासमोर गोठे आहेत़ त्यातील पशुधनावर गोचिड बसतात़ हे गोचिड इन्फेक्टेड झाले व त्यांनी मानवास चावा घेतला की या तापीचा संसर्ग होतो़ हा आजार चिकुन गुणियासदृश्यच आहे़ दोन्ही आजारातील लक्षणात साम्य आहे़ गावात झालेल्या दोन मृत्यूचा या आजाराशी संबंध नाही़ गोचिड तापीने मणुष्य मृत्युमुखी पडण्याची शक्यता फार कमी असते, असे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़जहूर सय्यद यांनी सांगितले़