गायरानावर द्या घरकुलास परवानगी; बोरखेडा, देवळालीतील ग्रामस्थांची मागणी
By सूरज पाचपिंडे | Published: September 15, 2023 04:02 PM2023-09-15T16:02:41+5:302023-09-15T16:04:11+5:30
प्रशासनाने वंचित कुटुंबांना गायरान जमिनीवर घरे बांधण्यास परवानी द्यावी
धाराशिव : तालुक्यातील बोरखेडा, देवळाली गावातील अनुसूचित जाती-जमातींना गायरान जमिनीवर घरकुल बांधण्यास परवानगी देण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी भारतीय दलित एक्य कृषी समितीच्या पदाधिकारी शुक्रवारपासून जिल्हा कचेरीसमोर उपोषणास बसले आहेत.
तालुक्यातील बोरखेडा व देवळाली येथील अनुसूचित जातीतील कुटुंब १९९३ पासून गायरान जमिनीवर कच्ची घरे बांधून वास्तव्यास आहेत. मात्र, अद्यापही त्यांना हक्काचे पक्के घर नाही. त्यामुळे बोरखेडा व देवळाली येथील अनुसूचित जातीतील बांधव शुक्रवारी जिल्हा कचेरीसमोर उपोषणास बसले आहेत. ज्या जागेवर वास्तव्यास आहोत, त्या ठिकाणी वास्तव्यास आहोत, तेथील नळपट्टी, घरपट्टी, लाइट बिल नियमित भरले जाते. मात्र, ग्रामपंचायतीकडून रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर केली जात नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.
घरे नसल्यामुळे ऊन, वारा, पावसात उघड्यावर राहावे लागत असल्याने प्रशासनाने वंचित कुटुंबांना गायरान जमिनीवर घरे बांधण्यास परवानी द्यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली आहे. आंदोलनात भारतीय दलित ऐक्य कृती समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश बनसोडे, डी.बी. बनसोडे, दादासाहेब जेटीथोर, सुधाकर माळाळे यांच्यासह बोरखेडा, देवळाली येथील ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्राही उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.