लातुरातून ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंगसाठी परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:31 AM2021-04-18T04:31:57+5:302021-04-18T04:31:57+5:30
उमरगा : उमरगा व लोहारा तालुक्यातील रुग्णांसाठी लातूर जिल्ह्यातून ऑक्सिजन सिलिंडर रिफिल करून घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आ. ...
उमरगा : उमरगा व लोहारा तालुक्यातील रुग्णांसाठी लातूर जिल्ह्यातून ऑक्सिजन सिलिंडर रिफिल करून घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आ. ज्ञानराज चौगुले यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
उमरगा व लोहारा तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह व इतर गरजू रुग्णांना उमरगा येथील जनसेवा गॅस एजन्सीद्वारे ऑक्सिजन गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जात असून, ही एजन्सी उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथील कंपनीकडून गॅस रिफिल करून घेते. परंतु, हा अत्यंत कमी क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट असून सध्याची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता, उमरगा व लोहारा तालुक्यातील शासकीय व खाजगी (कोविड-१९) रुग्णालयांत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. तसेच पोस्ट कोविड रुग्ण, अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या विशेषतः नवजात बालके यांनाही आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुरवठा करणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे डॉक्टर्स व रुग्णांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
यासाठी उमरगा येथील जनसेवा गॅस एजन्सीने लातूर येथील गॅस एजन्सीमधून दररोज किमान ५० जम्बो ऑक्सिजन गॅस सिलिंडर रिफिल करून मिळण्यासाठी परवानगी मागितलेली आहे. त्यामुळे उमरगा, लोहारा तालुक्यातील रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने लातूर येथील एजन्सीकडून ऑक्सिजन गॅस सिलिंडर रिफिल करण्यासाठी परवानगी देण्याबाबत लातूर जिल्हाधिकारी यांना सूचना कराव्यात, अशी मागणी आ. चौगुले यांनी पत्राद्वारे केली आहे. या पत्राच्या प्रती त्यांनी विभागीय आयुक्त व लातूर जिल्हाधिकारी यांनाही दिल्या आहेत.