‘बीपीएल’चे अनुदान मिळवून देण्याच्या अमिषाने वृध्देचे दागिने लंपास केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 03:24 PM2018-09-20T15:24:22+5:302018-09-20T15:26:12+5:30
नगर पालिकेत आलेले ‘बीपीएल’चे अनुदान मिळवून देण्याचे अमिष दाखवित एका वृध्द महिलेचे पाऊण लाखाचे दागिने एका महाठगाने लंपास केले़
उस्मानाबाद : नगर पालिकेत आलेले ‘बीपीएल’चे अनुदान मिळवून देण्याचे अमिष दाखवित एका वृध्द महिलेचे पाऊण लाखाचे दागिने एका महाठगाने लंपास केले़ ही घटना बुधवारी दुपारी शहरातील शम्स चौक व नगर पालिकेच्या आवारात घडली़ या प्रकरणी बुधवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहरातील ख्वॉजा नगर भागातील शम्स चौकात असलेल्या एका पिठाच्या गिरणीत नजमुन नवाब शेख (वय-६०) व त्यांचे पती बसले होते़ त्यावेळी तेथे आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने ‘तुमचे बीपीएल’चे पैसे नगर पालिकेत आले आहेत़ ते मिळविण्यासाठी तुमची सही, आणि फोटो लागतो,’ असे सांगितले़ त्या व्यक्तीसमवेत नजमुन शेख व त्यांचे पती रिक्षातून नगर पालिकेजवळ आले़ तेथे त्या व्यक्तीने त्यांच्या पतीला नगर पालिकेत नेले़ नंतर परत येऊन घरून आधारकार्ड आणण्याची मागणी केली़ सोबत सोन्याचे दागिने आणण्यास सांगितले़ नजमुन शेख यांनी घरी जाऊन दागिने व आधार कार्ड आणले़.
यानंतर फोटो काढायचे असल्याने शेख यांनी दागिन्याची पिशवी त्या व्यक्तीकडे दिली़ दागिन्याची पिशवी तुमच्या पतीकडे देतो, असे सांगून शेख यांना आधारकार्डची झेरॉक्स काढायला लावली़ ही प्रक्रिया झाल्यानंतर त्या व्यक्तीने नजमुन शेख यांना रिक्षासाठी ५० रूपये देऊन मुलाला घेऊन येण्यास सांगितले़ घरी गेल्यानंतर नजमुन शेख यांनी पतीकडे सोन्याच्या दागिन्याच्या पिशवीबाबत विचारणा केली़ त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला़ नगर पालिकेच्या आवारात जाऊन त्या व्यक्तीचा शोध घेतला़ मात्र, तो मिळून न आल्याची फिर्याद नजमुन शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली़ या फिर्यादीवरून बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि दिनेश जाधव हे करीत आहेत़
अमिषाला बळी पडू नका
शासकीय अनुदान, सोने उजळून देण्याचे अमिष दाखवून सर्वसामान्यांचे दागिने लंपास केले जात आहेत़ शिवाय मोबाईलवरून बँकेचे खाते, ओटीपी मागवूनही आर्थिक लूट केल्याच्या अनेक घटना आहेत़ नागरिकांनी अशा अमिषाला बळी पडू नये, बँकेची माहिती कोणाला देऊ नये, असे आवाहन पोनि सुनिल नेवसे यांनी केले आहे़