आंदोरा ग्रामपंचायत कन्यारत्नाच्या जन्माचे करणार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:26 AM2021-01-02T04:26:53+5:302021-01-02T04:26:53+5:30
कळंब : कन्यारत्नाचे स्वागत व्हावे, स्त्रीजन्माप्रती आदर निर्माण व्हावा या उद्देशाने आंदोरा ग्रामपंचायतीने ‘कन्यारत्न स्वागत’ हा अभिनव उपक्रम ...
कळंब : कन्यारत्नाचे स्वागत व्हावे, स्त्रीजन्माप्रती आदर निर्माण व्हावा या उद्देशाने आंदोरा ग्रामपंचायतीने ‘कन्यारत्न स्वागत’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याद्वारे गावच्या रहिवासी दाम्पत्यास कन्यारत्न प्राप्ती झाल्यावर ठराविक रकमेचे आर्थिक कवच लाभणार आहे.
आंदोरा ग्रामपंचायतीचे सदस्य तथा ग्रामविकास आघाडीचे प्रमुख पी. जी. नाना तांबारे यांनी आपल्या गावात जन्मलेल्या कन्यारत्नाच्या जन्माचे स्वागत व्हावे याकरिता पथदर्शी उपक्रम राबविण्याचा संकल्प केला होता. ग्रामीण भागात आजही स्त्री जन्माचे म्हणावे असे स्वागत होत नाही. महिलांना योग्य ते स्थान दिले जात नाही. यामुळे त्यांनी हा संकल्प केला होता. यानुसार नववर्षांरभ, ३ जानेवारी रोजीचा बालिका दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, १२ जानेवारी रोजीची राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत आंदोरा ग्रामपंचायतीच्या वतीने कन्यारत्न स्वागत योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. यामधून गावचे रहिवासी असलेल्या दाम्पत्यास पहिले किंवा दुसरे कन्यारत्न प्राप्त झाल्यास तीन हजार ५१ रुपयांचा राष्ट्रीयीकृत बँक किंवा पोस्टाचा ‘एफडीआर’ देण्यात येणार आहे. गावातील कोणत्याही प्रवर्गाच्या, घटकाच्या व्यक्तींना याचा लाभ घेता येणार आहे. सदर मुलीचे वय वर्षे १८ पूर्ण झाल्यानंतर संबंधित रक्कमेचे संपूर्ण आर्थिक कवच पालकांना मिळणार आहे, असे पी. जी. नाना तांबारे यांनी सांगितले.
चौकट...
अशा आहेत अटी व शर्ती
आंदोरा ग्रामपंचायत व पी. जी. कंस्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असलेली कन्यारत्न स्वागत योजना तिसरे अपत्ये झाल्यास व अठरा वर्षे वयापूर्वी विवाह केल्यास लागू राहणार नाही.
ग्रामपंचायतीचे कर व देय रक्कम थकबाकी असणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. सुरुवातीला लाभ घेतला अन् नंतर तिसरे अपत्ये झाल्यावरही योजना लाभ देय नाही, असे तांबारे यांनी सांगितले.