पशुखाद्याच्या भावात वाढ, दुधाचे दर ८ रुपयांनी घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:32 AM2021-05-14T04:32:06+5:302021-05-14T04:32:06+5:30

बाबू खामकर पाथरूड - काेराेनाच्या पहिल्या लाटेच्या तडाख्यातून दुग्ध व्यवसाय कसाबसा सावरत असतानाच दुसरी लाट धडकल्यानंतर राज्य शासनाकडून निर्बंध ...

Animal feed prices rise, milk prices fall by Rs 8 | पशुखाद्याच्या भावात वाढ, दुधाचे दर ८ रुपयांनी घसरले

पशुखाद्याच्या भावात वाढ, दुधाचे दर ८ रुपयांनी घसरले

googlenewsNext

बाबू खामकर

पाथरूड - काेराेनाच्या पहिल्या लाटेच्या तडाख्यातून दुग्ध व्यवसाय कसाबसा सावरत असतानाच दुसरी लाट धडकल्यानंतर राज्य शासनाकडून निर्बंध अधिक कठाेर करण्यात आले. याचा फटका इतर लहान-माेठ्या उद्याेग, व्यवसायाेसाबतच दुग्ध व्यवसायालाही बसला आहे. पहिल्या लाटेवेळी ३० ते ३२ रुपये लिटर या दराने विक्री हाेणारे दुधाचा दर सध्या १८ ते २० रुपयांपर्यंत खाली आला आहे. असे असतानाच दुसरीकडे पशुखाद्याचे दर मात्र प्रचंड भडकले आहेत. परिणामी हा व्यवसाय सध्या आतबट्ट्याचा ठरू लागला आहे.

भूम, वाशी हा डाेंगराळ भाग आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत पाऊसही कमीच पडताे. सिंचनाची फारशी साेय नसल्याने बहुतांश शेतीक्षेत्र पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे या दाेन्ही तालुक्यांतील शेतकरी शेतीला जाेडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालताे. मागील दाेन वर्षांपर्यंत दुधाला चांगला दर मिळत हाेता; परंतु काेराेनाची पहिली लाट येताच केंद्र सरकारकडून देशव्यापी लाॅकडाऊन करण्यात आला. दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी प्रचंड खाली आली. डेअऱ्या, खवा भट्ट्या बंद करण्याची नामुष्की आली. ग्रामीण भागात दूध फुकट वाटावे लागले. कालांतराने काेराेनाचा संसर्ग ओसरत गेला. त्यानुसार लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले. परिणामी दुधाला मागणी वाढल्याने दरही वधारले. ३० ते ३२ रुपये लिटर दराने दूध शेतकऱ्यांकडून घेतले जात हाेते. त्यामुळे हळूहळू दर वाढतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने धडक दिली. परिणामी राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कठाेर करण्यात आले. त्यामुळे रुळावर आलेला दुग्ध व्यवसाय पुन्हा घसरणीला लागला आहे. सध्या प्रतिलिटर २२ रुपयांवर शेतकऱ्यांची बाेळवण केली जात आहे. म्हणजेच आठ रुपयांनी दर घसरले आहेत. एकीकडे दूध अत्यल्प दराने घालावे लागत असताना, दुसरीकडे पुशखाद्याचे दर मात्र प्रचंड गतीने वाढत आहेत. वाढलेले दर आणि दुधाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. परिणामी हा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरू लागला आहे. उपराेक्त चित्र लक्षात घेता दुधाला कितान ३० रुपये लिटर याप्रमाणे दर मिळावा, अशी मागणी दूग्ध उत्पादक शेतकरी करीत आहेत.

चाैकट...

दरराेज २० हजार लिटर संकलन..

भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या माेठी आहे. त्यामुळे दररोज जवळपास २० हजार लिटर दूध उत्पादित हाेते. यातील काही दूध डेअरीकडे तर काही दूध खव्यासाठी वापरले जात आहे. मात्र, दुधाला खर्चाच्या प्रमाणात दर मिळत नाही. दुधाच्या माध्यमातून पैसे व झालेला खर्च याच्यात कुठेही ताळमेळ बसत नाही. त्यामुळे हा व्यवसाय ताेट्यात जात आहे. याच ठिकाणी खऱ्या आर्थाने दुग्ध व्यवसायाचा गळा घाेटला जात आहे. त्यामुळे सरकारने किमान ३० रुपये प्रतिलिटर एवढा तरी दर द्यावा, अशी मागणी हाेत आहे.

काेट...

काेराेनाच्या पहिल्या लाटेतही दुधाला २९ ते ३० रुपये दर हाेता; परंतु दुसऱ्या लाटेत दुधाचे दर प्रचंड घसरले आहेत. आजघडीला शेतकऱ्यांना २२ रुपये प्रतिलिटर या दराने दूध संकलकांकडे द्यावे लागत आहेत. परिणामी या व्यवसायातून सध्या तरी नफ्याऐवजी ताेटाच हाेत आहे.

-बाळू वनवे, आनंदवाडी.

Web Title: Animal feed prices rise, milk prices fall by Rs 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.