निलंबित मुख्याधिकारी येलगट्टेंचा पाय आणखी खोलात; आता २७ कोटींच्या अपहाराची तक्रार
By सूरज पाचपिंडे | Updated: August 16, 2023 16:40 IST2023-08-16T16:39:37+5:302023-08-16T16:40:50+5:30
विविध विकास योजना व इतर खर्चाबाबतची ५१४ प्रमाणके गहाळ

निलंबित मुख्याधिकारी येलगट्टेंचा पाय आणखी खोलात; आता २७ कोटींच्या अपहाराची तक्रार
धाराशिव : येथील नगरपालिकेचे निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांचे पाय आणखी खोलात रुतत चालले आहेत. त्यांच्यावर यापूर्वीच अपहाराचा गुन्हा दाखल झालेला असताना आता आणखी एक अपहाराचे प्रकरण समोर आले आहे. त्याची रक्कम सुमारे २७ कोटींवर आहे. या प्रकरणातही सोमवारी रात्री आनंदनगर ठाण्यात येलगट्टेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिकल्याण येलगट्टे यांच्यासह तत्कालीन लेखापाल सूरज संपत बोर्डे व अंतर्गत लेखापरीक्षक प्रशांत विक्रम पवार यांनी ६ जुलै २०२० ते २१ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत विविध कामांची एकूण १०८८ प्रमाणके शासकीय अभिलेख असतानाही व ते लेखा विभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असतानाही ती ठेवली नाहीत. शिवाय विविध विकास योजना व इतर खर्चाबाबतची ५१४ प्रमाणके गहाळ केली आहेत. या प्रमाणकांची एकूण रक्कम २७ कोटी ३८ लाख ७८ हजार १०० रुपये इतकी आहे. या रकमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने उपरोक्त तिघांनी ही प्रमाणके जाणिवपूर्वक लेखा विभागात ठेवली नसल्याची तक्रार सोमवारी पालिकेचे लेखापाल अशोक कलेश्वर फरताडे यांनी आनंद नगर पोलिसांकडे दिली आहे. त्यानुसार तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.