कोणीही यावे, थुंकून जावे..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:12 AM2021-02-05T08:12:55+5:302021-02-05T08:12:55+5:30
उस्मानाबाद : विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून एकीकडे जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांची साफसफाई सुरू झालेली असतानाच उस्मानाबादेतील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत मात्र या ...
उस्मानाबाद : विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून एकीकडे जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांची साफसफाई सुरू झालेली असतानाच उस्मानाबादेतील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत मात्र या उपक्रमापासून अलिप्त राहिली आहे. कोणीही यावे अन् थुंकून जावे, अशीच अवस्था या इमारतीची झाली आहे. कहर म्हणजे अगदी कार्यालयांच्या दरवाज्यांवरही थुंकीचा सडा येथे दिसतो.
शासकीय कार्यालय व परिसरातील अस्वच्छतेचे चित्र सर्वत्रच पाहिल्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ते बदलण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत. यातूनच सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम जिल्हाभरात सुरू झाला आहे. महसूल विभागाने त्यांच्या अखत्यारितील तहसील कार्यालये तर जिल्हा परिषदेने पंचायत समित्यांचे रुपडे पालटण्यास गती दिली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या उपक्रमांतर्गत आपण बसणारी, वावरणारी जागा स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगाने साफसफाई मोहीम हाती घेतली आहे. यातून बऱ्याच कार्यालयांचे चित्र आता पालटले आहे. मात्र, दररोज हजारो लोकांची ये-जा असलेल्या उस्मानाबादेतील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला मात्र या उपक्रमात कोणताही रस नाही की काय, अशीच अवस्था दिसून येत आहे. अगदी इमारतीच्या प्रवेशद्वारापासूनच नाक मुठीत घेऊन इमारतीत वावरावे लागते. प्रवेशद्वारावर, पायऱ्यांवर, भिंतींवर पानसुपारी खाऊन थुंकलेले चित्र बुधवारी आढळून आले. या इमारतीतील एकही भिंत अशी दिसून आली नाही की जेथे पिचकाऱ्यांचे सडे नाहीत. हद्द म्हणजे अगदी कार्यालयाच्या दारावरही थुंकलेले दिसून आले. स्वच्छतागृहांची तर अवस्था पहायलाही जायला नको, अशी आहे. कार्यालयाच्या अंतर्गत भागात काहीसा नीटनेटकेपणा मात्र जरुर दिसला. तरीही फार चित्र बदलले असे नक्कीच नाही. अवघ्या जिल्हाभरातील इतर कार्यालये सुंदर होत असताना मध्यवर्ती इमारतीलाच का स्वच्छतेचे वावडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खिडक्यांखाली थुंकतंय कोण..?
इमारतीच्या आतील भागातील भिंती, पायऱ्यांवर बाहेरुन येणारे नागरिक थुंकून घाण करतात. मात्र, यात येथील कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहेच. या कार्यालयाच्या बाह्य भागाचे फेरी मारुन चित्र पाहिले असता बऱ्याच खिडक्यांच्या खाली थुंकीचे सडे दिसले. कामासाठी आलेले नागरिक कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या-टेबल ओलांडून त्यांच्याचसमोर खिडकीतून बाहेर थुंकण्याचे धाडस करतील, असे वाटत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी स्वत:ही परिसर स्वच्छ राखण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
दारुच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या...
इमारतीच्या बऱ्याच भागात घाणीसोबतच कचऱ्याचेही प्रमाण वाढले आहे. पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर गेल्यानंतर काही ठिकाणी दारुच्या रिकाम्या बाटल्या, गुटख्याचे पाऊच फेकून दिलेले आढळून आले. इतर कचराही याठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला.