पहिल्याच पावसात रस्त्याला तळ्याचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:24+5:302021-06-09T04:40:24+5:30
कळंब : तालुक्यातील नायगाव येथे पहिल्याच पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाबीकडे ...
कळंब : तालुक्यातील नायगाव येथे पहिल्याच पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाबीकडे नागरिकांनी तक्रार करून देखील दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिक आजारी पडत असून, त्यांना कोरोनापाठोपाठ आता डेंगू, मलेरिया या आजाराशी सामना करावा लागत आहे.
नायगाव येथील झोपडपट्टी भागातील वार्ड क्रमांक १ मध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुने नालीच नसल्याने संपूर्ण पाणी या रस्त्यावर साचत आहे. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून, रस्त्याला गटाराचे स्वरूप आले आहे. अशा दुर्गंधीत येथील नागरिक वास्तव्य करत आहेत. या रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना तोंडाला रुमाल लावावा लागत आहे.
दरम्यान, मंगळवारी ग्रामपंचायत सदस्य लिबराज शितोळे यांच्या नेतृत्वाखाली तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष लालासाहेब शितोळे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुधाकर शितोळे, गोविंद वाघे,केशव शितोळे शितोळे, राजाभाऊ शितोळे यांनी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी येतील नागरिकांनी या बाबीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असून, मंजूर असलेली नालीचे काम देखील होत नसल्याचा आरोप करण्यात आला.
विरोधी सदस्याच्या वॉर्डातील कामे होईनात
विरोधी पक्षाच्या वॉर्डातील कामे जाणून बुजून सत्ताधारी पक्ष होऊ देत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत मधील शिवस़ोना सदस्य अविदा राऊत, रत्नमाला शितोळे, विष्णूपंत शितोळे यांनी केला आहे. नालीचे काम मंजूर असून या कामाला जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
वार्ड क्रमांक १ मध्ये शिवसेनेचे सदस्य निवडून आल्यामुळे सरपंचांकडून आमच्या वॉर्डातील कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. या कामाबाबत आम्ही सतत अर्ज व वारंवार सूचना देऊनही नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.
- लिंबराज शितोळे, सदस्य ग्रामपंचायत