क्रीडा संकुलाला उकिरड्याचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:27 AM2021-07-25T04:27:08+5:302021-07-25T04:27:08+5:30
कोटीचा निधी कागदावरच : केलेली विकास कामेही गेली वाया संतोष वीर भूम : खेळाडूंच्या अंगी असलेल्या क्रीडागुणांचा विकास व्हावा, ...
कोटीचा निधी कागदावरच : केलेली विकास कामेही गेली वाया
संतोष वीर
भूम : खेळाडूंच्या अंगी असलेल्या क्रीडागुणांचा विकास व्हावा, यासाठी शहरात क्रीडा संकुल उभारण्यात आले. यासाठी जवळपास अकरा वर्षापूर्वी एक कोटीचा निधीही उपलब्ध झाला होता. परंतु, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींंच्या दुर्लक्षामुळे सद्यस्थितीत या क्रीडा संकुलाला उकिरड्याचे स्वरूप आल्याचे दिसत आहे.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीनजीक या क्रीडा संकुलाची उभारणी झाल्यानंतर २०१० साली यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. बजेट आले आहे तेव्हापासून आजवर या निधीतून केवळ ३० लक्ष रुपये खर्चून ४०० मीटर लांबीचा ट्रॅक, संरक्षक भिंत, संरक्षक भिंतीवर विविध खेळाची छायाचित्रे, लेवलिंग, वीज व क्रीडा संकुलात प्रवेश करण्यासाठी प्रवेश गेट ही कामे करण्यात आली. मात्र, यानंतर याच्या देखभालीकडेही दुर्लक्ष झाल्याने या कामांपैकी सध्या केवळ वीज आणि संरक्षक भिंतीवरील चित्रे सुस्थितीत दिसून येत आहेत. सध्या या क्रीडा संकुलात जागोजागी कचरा, काटेडी झुडपे, गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून, काही ठिकाणी पाण्याचे डबकेही साचल्याचे दिसून येते. यामुळे उर्वरित निधीमधून क्रीडा संकुलाचा विकास करावा, अशी मागणी खेळाडू, क्रीडाप्रेमींतून होत आहे.
कोट........
सध्या स्पर्धेचे युग आहे. बऱ्याच शहरात सर्व सोयींनी युक्त क्रीडा संकुल असल्यामुळे तेथील खेळाडू हे उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतात. यामुळे भूम शहरातील क्रीडा संकुलही तातडीने व्यवस्थित करावे, जेणेकरून शहरासह तालुक्यातील खेळाडूंना याचा फायदा होईल.
- किरण खुणे, खेळाडू
सध्या भूम शहरात खेळाडूंना खेळण्यासाठी एकच मैदान आहे. परंतु, याचीही निगा राखली जात नसल्याने अनेक खेळांपासून खेळाडूंना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याच्या विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- अमोल जाधव, खेळाडू
मागील महिनाभरापासून क्रीडा संकुलात विविध कामे सुरू आहेत. सध्या गवत वाढले असून, यावर तणनाशक फवारणी करायची आहे. परंतु, पाऊस उघडीप देत नसल्याने अडचण येत आहे. पाऊस थांबताच संकुलात तणनाशक फवारणी करण्यात येईल.
- कैलास लटके, क्रीडा अधिकारी