सफरचंद झाले स्वस्त, ड्रॅगन फ्रुट महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:31 AM2021-08-29T04:31:36+5:302021-08-29T04:31:36+5:30
उस्मानाबाद : श्रावणातील उपवासामुळे फळांना मागणी वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी सफरचंद, मोसंबीची आवक कमी असल्याने दर गगनाला भिडले ...
उस्मानाबाद : श्रावणातील उपवासामुळे फळांना मागणी वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी सफरचंद, मोसंबीची आवक कमी असल्याने दर गगनाला भिडले होते. सध्या या फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने सफरचंद, मोसंबीचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. केळीची मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने केळी महागली आहे.
श्रावण महिन्यात हवेत ओलसरपणा असल्याने जड पदार्थ पचण्यास अवघड होऊन जाते. अनेक जण मांसाहारी जेवणही बंद करतात. अनेक सणवार या महिन्यात प्रामुख्याने येत असल्याने श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार हे महिनाभरात नित्याने येणारे उपवास, गोकुळाष्टमी या सणांचे उपवास केले जातात. यामुळे फळ व उपवासाच्या पदार्थाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या बाजारात श्रावणात सफरचंद, डाळिंब, केळी, ड्रगन फ्रुटला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दोन महिन्यांपूर्वी सफरचंदाची आवक कमी असल्याने सफरचंदाचे प्रतिकिलोचे दर २०० रुपयाच्या पुढे सरकले होते. सध्या सफरचंदाचा बहार सुरु झाल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे दरही समान्यांच्या आवाक्यात आले आहेत. १०० ते १२० रुपये किलोने सफरचंदाची विक्री होत आहे. १४० रुपये किलोने विक्री होणारी माेसंबी सध्या ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर दुसरीकडे केळीची आवक कमी असल्याने २० रुपये डझनप्रमाणे विक्री होणारी केळी ४० ते ५० रुपये डझनप्रमाणे विक्री होत असल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले.
असे आहेत फळांचे दर
सफरचंद १०० ते १२० रुपये किलो
डाळींब १२० ते १४०
संत्रा २००
मोसंबी ५० ते ६०
चिकू १००
पपई ६०
पेरू ८०
ड्रगन फ्रुट २००
अननस गेले १०० रुपये नग
उन्हाळ्याच्या दिवसात ज्युससाठी अननसाला मोठी मागणी असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात त्याचे दर चढेच असतात. उन्हाळ्याच्या दिवसात त्याचा दर प्रतिनग ६० रुपये इतका होता. पावसाळ्याच्या दिवसातही अननस ८० ते १०० रुपये नगाप्रमाणे विक्री होत आहे. शहाळे ४० रुपये नग प्रमाणे विक्रीस आहेत.
कोट...
बाजारात शिमला येथून सफरचंदाची आवक होत आहे. आवक अधिक असल्याने सफरचंदाचे दर उतरले आहेत. उपवासामुळे केळी, सफरचंद, संत्रा, मोसंबीला मागणी आहे. आजारी व्यक्ती डेंग्यूचे रुग्णांसाठी नातेवाईक ड्रगन फ्रुट, पपई खरेदी करीत आहेत.
अलीम बागवान, फळविक्रेते