सत्तर गावांमध्ये पर्यवेक्षक नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:32 AM2021-04-18T04:32:17+5:302021-04-18T04:32:17+5:30
कळंब : गावपातळीवरचा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पन्नास कुंटूबासाठी एक पर्यवेक्षक नियुक्त करावा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ...
कळंब : गावपातळीवरचा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पन्नास कुंटूबासाठी एक पर्यवेक्षक नियुक्त करावा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. यावर तातडीने कार्यवाही करण्यात आली असून, तालुक्यातील जवळपास सत्तरच्या आसपास गावात शनिवारी अशा पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत आहे. पहिल्या लाटेत तालुक्यात तेराशेच्या आसपास रूग्ण होते. सदर आकडे हे आठ महिन्यातील होते. दुसऱ्या लाटेत मात्र रूग्णसंख्येची ही वाढ अनपेक्षित अशी असून, अवघ्या दीड महिन्यात चारशेचा पल्ला गाठला आहे. यास्थितीतही ग्रामीण भागात प्रशासनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. गावगाड्यात मोक्कार टोळक्यांना अन् घोळक्यांना काही कमी नाही. पोलिस दिसले तरच गळ्यातला मास्क नाकातोंडावर येतो अन् सोशल डिस्टन्सचा तर जागोजागी फज्जाच, अशी विदारक स्थिती दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी अभिनव असा ‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ हा उपक्रम हाती घेत गावातील पन्नास कुंटूबासाठी एक पर्यवेक्षक नियुक्त करावा, अशा सूचना पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.
यानुसार कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. पी. राजगुरू यांनी आदेश प्राप्त झालेल्या शुक्रवारच्या दिवशीच गावपातळीवर यानुसार नियोजन करावयाच्या सूचना दिल्या. याकामी शिक्षण विभाग ही नियोजन प्रक्रियेत सहभागी झाला होता. यासाठी तालुक्यातील विविध गावातील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी याचे नियोजन करण्यासाठी बैठका पार पडल्या. यानुसार गावातील लोकसंख्या विचारत घेत पन्नास कुंटूबाचे गट करण्यात आले. यासाठी पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक यांनी या निर्णय प्रक्रियेत भाग घेतला. तालुक्यातील सत्तरच्या आसपास ग्रामपंचायतींनी शनिवारी या नियुक्तीस अंतिम स्वरूप दिले.
इतरांचाही सहभाग हवा
कोरोनाच्या काळात जोखीमस्तर जास्त असलेल्या कामांसाठी शिक्षक, अंगणवाडी ताई, मदतनीस यांना जुंपण्यात येत आहे. काळाची गरज व संकटाची व्याप्ती लक्षात घेत हा कर्मचारी वर्ग हे काम करत आला आहे व यापुढेही करणार आहे. मात्र, असे असले तरी गावस्तरावर कार्यरत असलेल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांनीही या आरोग्यविषयक आणीबाणीत सहभाग नोंदवत शिक्षक व इतर कर्मचारी यांच्यावरचा भार हलका करावा अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी दिलेल्या आदेशानुसार तालुक्यातील बहुतांश गावात पर्यवेक्षक नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांना यानुसार आदेश देण्यात येतील. याशिवाय यावर नियंत्रण ठेवणाऱ्या ग्राम पालक अधिकारी यांच्या नियुक्ती करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.
- एन. पी. राजगुरू, गट विकास अधिकारी, कळंब
फोटो :
तालुक्यातील बोर्डा येथे ‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ अभियान अंतर्गत पन्नास कुंटूबासाठी एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी उपसरपंच प्रणव चव्हाण दिसत आहेत.