दिलीप भालेराव यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:25 AM2020-12-25T04:25:47+5:302020-12-25T04:25:47+5:30
उमरगा : तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते दिलीप भालेराव यांची बीड जिल्ह्यातील पाटोदा व आष्टी या नगरपंचायतीच्या निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात ...
उमरगा : तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते दिलीप भालेराव यांची बीड जिल्ह्यातील पाटोदा व आष्टी या नगरपंचायतीच्या निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांना देण्यात आले. या दोन्ही नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असून, बीडचे जिल्हा अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्याशी संपर्क साधून निवडणुकीची तयारी करावी, असे पत्रात म्हटले आहे.
आठवडी बाजारातून दुचाकींची चोरी
उस्मानाबाद : आठवडी बाजारातून दोन दुचाकींची चोरी झाल्याची घटना तालुक्यातील पाटोदा येथे २० डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील गावसूद येथील रवींद्र भीमराव पेठे यांनी २० डिसेंबर रोजी त्यांची एमएच २५/ वाय २११४ व एमएच १३/ बीए २६९४ या क्रमांकाच्या दुचाकी पाटोदा येथील आठवडी बाजारात लावल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी त्या चोरून नेल्याची फिर्याद रवींद्र पेठे यांनी दिली. यावरून बेंबळी पोलीस ठाण्यात २२ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
उस्मानाबाद : तालुक्यातील पवारवाडी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह, गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरुदत्त सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पवारवाडी येथील मगर मळ्यातील दत्त मंदिरात हा सोहळा होत आहे. यात गुरुचरित्र कथेचे सादरीकरण ह.भ.प. बबन महाराज धायगुडे (लासरा) करणार असून, त्यांना ह.भ.प. बालाजी महाराज शेळके ह.भ.प. वैभव महाराज काशीद यांची गायन साथ तर ह.भ.प. अंकुश महाराज मगर यांची तबला साथ लाभणार आहे.
सेवानिवृत्तीनिमित्त चव्हाण यांचा सत्कार
भूम : येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातील पर्यवेक्षिका नूतन चव्हाण यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल चव्हाण, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम नवले, पर्यवेक्षिका रोहिणी कुलकर्णी, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, कार्यालयातील अरुण खाडे, प्रदीप कुडदे, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन धनश्री जगदाळे यांनी केले तर एस. ए. हुंबे यांनी आभार मानले.
नागरिक त्रस्त
(सिंगल फोटो : अंकुश अंधारे २४)
माणकेश्वर : येथील वाॅर्ड क्रमांक चार व पाचमध्ये गटारींची सोय नसल्याने नाल्यांचे पाणी भूम-माणकेश्वर-बार्शी या मुख्य रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्त्याची देखील दुरवस्था झाली असून, याबाबत कार्यवाहीची मागणी होत आहे.
निवडीबद्दल सत्कार
(सिंगल फोटो : संतोष वीर २४)
भूम : ऑल इंडिया पँथर संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी धीरज शिंदे तर शहराध्यक्षपदी संदीप सरोदे यांची नियुक्ती झाली. याबद्दल यशवंतराजे थोरात यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी राजू साठे, वाजीद मोमीन, ऋतिक वीर, अमित मस्कर उपस्थित होते.
वाहनाची चोरी
उस्मानाबाद : गोवर्धनवाडी येथील विक्रम चोरमले यांनी १८ डिसेंबर रोजी ढोकी येथे लावलेली दुचाकी चोरीस गेली. याप्रकरणी चोरमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २२ डिसेंबर रोजी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यात्रौत्सव रद्द
लोहारा : तालुक्यातील माकणी येथे दत्त जयंतीपासून सुरू होणारा सिद्धेश्वर यात्रौत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. यात्रा कमिटी अध्यक्ष मधुकर साठे, सरपंच विठ्ठल साठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पिके बहरली
येडशी : येडशीसह परिसरात सध्या रबी हंगामातील पिके बहरात आली आहेत. यंदा मान्सूनसह परतीच्या पावसाने देखील चांगली हजेरी लावल्यामुळे पिकांना याचा चांगला फायदा झाला आहे. यातून चांगले उत्पन्न हाती पडेल, अशी आशा व्यक्त होत आहे.