ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव; गावातील टीव्ही, मोबाइल रोज दोन तास बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 12:14 PM2022-11-27T12:14:31+5:302022-11-27T12:15:08+5:30

मुलांच्या अभ्यासासाठी जकेकूर ग्रामपंचायतीचा ठराव

Appreciable decision... TV, mobile phones in the village are off for two hours every day | ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव; गावातील टीव्ही, मोबाइल रोज दोन तास बंद

ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव; गावातील टीव्ही, मोबाइल रोज दोन तास बंद

googlenewsNext

समीर सुतके 

उमरगा (जि. उस्मानाबाद) : टीव्हीवरच्या मालिका, हातातील मोबाइल यातच अनेकांचे आयुष्य गुरफुटून गेले. याचा परिणाम कुटुंबाबरोबर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको, यासाठी अख्ख्या गावातील मोबाइल आणि टीव्ही सायंकाळी सहा ते रात्री आठ यावेळेत बंद ठेवण्याचा ठराव जकेकूरवाडी ग्रामपंचायतीने घेतला आहे. यासाठी दररोज भोंग्याच्या माध्यमातून आठवण करून दिली जात आहे.

नव्या साधनांचा दुष्परिणाम विविध माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. या परिणामांच्या पार्श्वभूमीवर जकेकूरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी यांनी विशिष्ट टीव्ही मालिका आणि मोबाइलमुळे मुलांच्या अभ्यासावर अधिक परिणाम होत असल्याचे सांगत ही साधनेच दररोज दोन तास बंद ठेवण्याचा निर्धार केला. ग्रामसभेत हा विषय घेण्यात आला तेव्हा सर्वसंमतीने तो मंजूरही करण्यात आला. यामुळे गावात सायंकाळी सहा ते रात्री आठ यादरम्यान प्रत्येक घरातले टीव्ही आणि मोबाइल बंद करून मुलांच्या अभ्यासासाठी वेळ राखीव करण्यात आला आहे. दररोज ठरलेल्या वेळेत टीव्ही आणि मोबाइल बंद करण्यासाठी आठवण करून देण्यास ग्रामपंचायतीवर भोंगाही लावला आहे. तसेच या वेळेत मुलं घराबाहेर पडणार नाहीत, याची जबाबदारी पालकांसोबत गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुलांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होऊन गुणवत्ता वाढीस हातभार लागेल, अशी आशा ग्रामस्थांना आहे. 

मुलांना अभ्यासाची सवय लागावी. टीव्ही व मोबाइलसारख्या गोष्टींपासून त्यांना ठरावीक वेळ तरी दूर ठेवण्यासाठी गावामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवले जाते. यावेळी सर्व नागरिकांनी आपले टीव्ही, मोबाइल, रेडिओ, लाऊडस्पीकर बंद करायचे व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसायचे, असे सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने ठरले आहे. या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- अमर सूर्यवंशी, सरपंच, जकेकूरवाडी

Web Title: Appreciable decision... TV, mobile phones in the village are off for two hours every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.