आम्ही कॉमन मॅन आहोत का? तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यास रोखल्याने जानकर संतापले
By बाबुराव चव्हाण | Published: October 4, 2023 05:46 PM2023-10-04T17:46:08+5:302023-10-04T17:47:04+5:30
प्रशासनाने माणसाचा प्रोटोकॉल बघून रोखण्याचा प्रयत्न करावा. असली मगरुरी चालणार नाही
तुळजापूर (जि. धाराशिव) : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना बुधवारी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात जाण्यापासून कर्मचाऱ्यांनी राेखले. यानंतर जानकर यांनी ‘आम्ही काय काॅमन मॅन आहाेत काय? प्रशासनाने व्यक्तींचा प्राेटाेकाॅल पाहून राेखण्याचा प्रयत्न करावा. ही मगरूरी चालणार नाही’, अशा शब्दात संताप व्यक्त केला. घडलेला प्रकार जिल्हाधिकारी यांच्या कानावर घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जनसुराज्य यात्रेच्या निमित्ताने रासपचे जानकर बुधवारी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले हाेते. दर्शन घेण्यासाठी ते गाभाऱ्यात जात असतानाच ‘बीव्हीजी’च्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मज्जाव केला. यानंतर जानकर चांगलेच संतापले. ‘आम्ही काय काॅमन मॅन आहाेत काय? आमचे फाेटाे लावून लाेक खासदार, आमदार हाेतात. माझा कुठेही कारखाना, उद्याेग नाही. मी माझ्या स्वार्थासाठी नव्हे तर राज्य आणि देशासाठी काम करताे. त्यामुळे प्रशासनाने माणसाचा प्रोटोकॉल बघून रोखण्याचा प्रयत्न करावा. असली मगरुरी चालणार नाही अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. ‘बीव्हीजी’चे मालक माझ्या गावचे आहेत. घडलेला हा प्रकार त्यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्या कानावर घालणार असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले.
‘ती’ अभिषेक पूजेची वेळ हाेती...
रासपचे महादेव जानकर श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले तेव्हा, सकाळची अभिषेक पूजा सुरू हाेती. ते गाभाऱ्यानजीक आले असतानाच पूजा संपली. मात्र, आरती सुरू हाेती. त्यामुळे अशावेळी ‘व्हीआयपीं’ना ज्या पध्दतीने दर्शन देताे, त्याच पध्दतीने त्यांचेही दर्शन झालेले आहे. ‘बीव्हीजी’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे जशी विचारणा केली जाते, तशीच विचारणा केली हाेती.
-साेमनाथ माळी, तहसीलदार तथा व्यवस्थापक, मंदिर संस्थान.