अपघाताच्या नोंदीसाठी लाच घेणाऱ्या उपनिरीक्षकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 07:09 PM2019-03-08T19:09:17+5:302019-03-08T19:10:10+5:30
पोलीस उपनिरीक्षक योगेश गोविंद पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले.
उस्मानाबाद : तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ मार्च रोजी झालेल्या एका अपघाताचा पंचनामा देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने दोन हजार रुपयांची लाच स्विकारल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक योगेश गोविंद पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले. ३ मार्च रोजी बेंबळी ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात घेण्यात आली होती. या अपघाताच्या पंचनाम्याची प्रत तक्रारदाराने योगेश पवार यांच्याकडे मागितली होती. या कामासाठी पवार यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपये मागितले. ते ठाण्यातच स्विकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने योगेश पवार यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी बेंबळी ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.