उमरग्यात ७० टक्के विद्यार्थ्यांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:28 AM2021-02-15T04:28:40+5:302021-02-15T04:28:40+5:30
उमरगा : डिसेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या नववी ते बारावीच्या वर्गासाठी विविध शाळांनी केलेल्या उपाययोजना, विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जात असलेले ...
उमरगा : डिसेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या नववी ते बारावीच्या वर्गासाठी विविध शाळांनी केलेल्या उपाययोजना, विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जात असलेले नियमांचे पालन यामुळे या वर्गांची पटसंख्या वाढली आहे. शालेय विभागाच्या सूचनेनुसार २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असून, सुमारे ७० टक्के विद्यार्थी हजर राहत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
कोरोना महामारीमुळे मागील शैक्षणिक वर्षाच्या अखेरीपासून शाळा बंद करण्यात आल्या. शिवाय परीक्षाही रद्द करण्यात आल्या. यामुळे शासनाच्या आदेशानुसार सर्व शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. शाळा बंद काळात शिक्षकांनी विविध विषयांचे अभ्यासाचे ऑनलाइन व्हिडिओ टाकले. परंतु, विद्यार्थीदेखील ऑनलाइन अभ्यासक्रमास कंटाळले होते. त्यातच बऱ्याच पालकांकडे अन्ड्रॉइड मोबाइल नसल्याने ऑनलाइन अभ्यासक्रमास अडचणी येत होत्या. परंतु, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, दुसरीकडे ऑनलाइन शिक्षणातदेखील अनेक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाच्या शालेय विभागाने पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. यासाठी पालकांकडून संमतीपत्रही भरून घेण्यात आले आहेत. शाळा खोल्या निर्जंतुक करण्यात आल्या असून, सर्व शाळांमध्ये तापमान व ऑक्सिजन तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वी उमरगा तालुक्यातील नववी ते बारावी तसेच पाचवी ते आठवी वर्गाला शिकविणाऱ्या ६२३ शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात चार शिक्षक वगळता कोणलाही कोरोनाची बाधा झालेली दिसून आली नाही.
तालुक्यात पाचवी ते बारावी वर्गाच्या ६७ शाळात १६ हजार ३८० विद्यार्थी असून, या विद्यार्थ्याचे दररोज थर्मल गनने तापमान व रक्तातील ऑक्सिजनची तपासणी केली जात आहे. शिवाय, विद्यार्थी व शिक्षकांना मास्क बंधनकारक करण्यात आले असून, दररोज सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. शाळा प्रशासनासोबतच विद्यार्थी देखील आवश्यक काळजी घेत असून, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार हे देखील प्रत्येक शाळेच्या संपर्कात राहून आढावा घेत आहेत. यामुळे विद्यार्थी संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.
कोट...........
उमरगा तालुक्यातील व शहरातील सर्व शाळा प्रथम निर्जंतुक करण्यात आल्या असून, कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी शाळांत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शिक्षक व विद्यार्थी यांना मास्क बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांचे शारीरिक तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जात आहे. ६२३ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. समाधानाची बाब म्हणजे शाळा सुरू होऊन १०० दिवस लोटले असून आता शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ७० टक्क्यांपर्यंत गेली आहे.
- शिवकुमार बिराजदार, गटशिक्षण अधिकारी, उमरगा