गोर सेनेच्या साखळी उपोषणाने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:40+5:302021-08-21T04:37:40+5:30
उस्मानाबाद : ओबीसी प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणासोबतच इतरही मागण्यांसाठी गोर सेनेच्यावतीने उस्मानाबादेत साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. चार दिवसांच्या ...
उस्मानाबाद : ओबीसी प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणासोबतच इतरही मागण्यांसाठी गोर सेनेच्यावतीने उस्मानाबादेत साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. चार दिवसांच्या आंदोलनाने लक्ष वेधल्यानंतर शुक्रवारी त्याची सांगता करण्यात आली. यादरम्यान, विविध पक्ष, संघटनांनी या आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ कार्यवाही करावी, मागासवर्गीय अधिकारी-कर्मचार्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, नवी मुंबई विमानतळास वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे या व इतरही काही मागण्यांसाठी गोर सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.संपत चव्हाण, प्रदेश संघटक राजाभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १७ ऑगस्ट रोजी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती. या साखळी उपोषणाची शुक्रवारी सांगता करण्यात आली. यादरम्यान, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, गुलाब जाधव, ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक सुरेश पवार, जिल्हाध्यक्ष संतोष राठोड, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, प्रदेश संपर्क प्रमुख डी.एन. कोळी, जिल्हा उपाध्यक्ष शुभम कदम, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, हरीश जाधव, महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस आबासाहेब खोत, कैकाडी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कदम, बामसेफचे मराठवाडा प्रमुख मारुती पवार, बी. डी. शिंदे यांच्यासह विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला.