उस्मानाबादेत सरासरीच्या ५२ टक्केच पाऊस;शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 04:40 PM2018-09-18T16:40:27+5:302018-09-18T16:41:09+5:30
पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटून गेले असतानाही जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५२.८८ टक्के एवढा पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद : सलग दोन वर्ष जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. सुरूवातीच्या काळात हवामान खात्याने केलेल्या भाकितानुसार यंदाही दमदार पर्जन्यमान होईल, अशी आशा होती. परंतु, पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटून गेले असतानाही जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५२.८८ टक्के एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तीन-चार वर्ष भीषण दुष्काळाचा सामना केल्यानंतर मागील दोन वर्ष जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे लहान-मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदाही दमदार पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना अशा होती. हवामान खात्यानेही पावसाळच्या प्रारंभीच दमदार पावसाचे भाकित केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा आणखीच पल्लवित झाल्या होत्या. परंतु, जिल्ह्यात आजवर झालेला पाऊस पाहता, हवामान खात्याचे भाकित भरकटल्याचे दिसून येते. मागील साडेतीन महिन्यात जिल्ह्यात जेमतेम ५२.८८ टक्के एवढा अल्प पाऊस झाला आहे.
खरीप पिके फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना जिल्ह्याच्या काही भागात २७, काही भागात २५ दिवस आणि काही भागात २० पेक्षा अधिक दिवस पावसाने उघडीप (खंड) दिली. त्यामुळे खरिपातील उडीद, मूग यासारखी नगदी पिके वाया गेली. एकरी एक ते दीड क्विंटलही उत्पादन मिळाले नाही. सायोबीनची अवस्थाही फारशी समाधानकारक नाही. सोयाबीनला शेंगा कमी लागल्या असून दाणेही पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे एकरी उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगतात.
दरम्यान, पावसाच्या खंडरूपी अडथळ्यांची शर्यत पार करीत खरीप हंगाम पार पडला असला तरी शेतकऱ्यांना आता रबी पेरणी होणार की नाही, याची चिंता लागली आहे. कारण अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
तीन तालुके पन्नाशीच्या आतच...
जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पर्जन्यमानावर नजर टाकली असता, चिंताजनक चित्र समोर येथे. तीन तालुक्यामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षाकही कमी पाऊस आहे. यामध्ये उस्मानाबाद ४२.८५ टक्के, भूम ४२.३७ आणि परंड्यात सर्वात कमी ३८.४७ टक्के पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे तुळजापूर ५५.३१, उमरगा ७७.४७, लोहारा ५१.०६, कळंब ५६.६८ आणि वाशी तालुक्यात ५८.६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
प्रकल्पांच्या घशाला कोरड कायम !
जिल्हाभरात लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्पांची संख्या साधारणे पावणेतीनशेच्या घरात आहे. मागील दोन वर्षांत बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु, यंदाच्या पावसाळ्यातील तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटूनही पन्नास टक्क्यांच्या आसपास पाऊस झाल्याने जवळपास सर्वंच प्रकल्पांच्या घशाची कोरड कायम आहे.